जिल्ह्यातील जि.प.च्या 62 शाळा इमारती विना

एक वर्षापुर्वी पाठवलेला प्रस्ताव धुळखात पडून, जिल्हा परिषद कधी दखल घेईल
जिल्ह्यातील जि.प.च्या 62 शाळा इमारती विना

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

स्वातंत्र्याची 75 वर्ष होवून देखील नंदुरबार जिल्ह्यातील 62 जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळांना (schools) स्वतःची इमारत (Own building) नाही. काही शाळांना इमारत आहे. तर ती पडक्यास्वरूपात आहे. विद्यार्थ्यांच्या (Students) जिवीतास धोका निर्माण होवू नये,यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांनी इमारतीसाठी एक वर्षापुर्वी प्रस्ताव सादर केला. मात्र अद्यापही त्याची दखल न घेतल्यामुळे प्रस्ताव (Proposal) धुळखात पडून आहे. या शाळांना स्वतःची इमारत केव्हा मिळेल हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेवून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या, जीर्ण इमारती तात्काळ पाडणे व कौलारु , कुडाच्या छतात भरणार्‍या जिल्हा परिषद शाळांना तात्काळ नवीन इमारत मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती ह्या पडक्या, जीर्ण झाल्या असून त्यातील काही इमारती या कोसळल्या असून काही जिल्हा परिषद शाळेच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या असून , सदर इमारती ह्या कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही व सदर जीर्ण झालेल्या इमारती अचानक कोसळल्यास जिवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही . यास्तव जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या,जुन्या, जीर्ण झालेल्या इमारती पाडणेबाबतचे प्रस्ताव मागील एक वर्षांपासून जमा होवुन देखील नंदुरबार जिल्हा परिषदेने सदर प्रस्तावाकडे आजपावेतो दुर्लक्ष केलेले असून काही एक कार्यवाही केलेली नाही.तसेच विद्यार्थी हे मधल्या सुट्टीत शालेय प्रांगणात खेळत असतात.यातच सदर जीर्ण झालेल्या इमारती कोसळुन विद्यार्थ्यांची जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच काही शालेय इमारतीच्या प्रांगणात विटा पडलेले आहेत , भिंती कोसळलेल्या आहेत.काही जिल्हा परिषद शाळेचे लोखंडी पत्रे उडलेले आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना शारिरीक इजा होवुन गंभीर दुखापत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.तरी नंदुरबार जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या , जीर्ण झालेल्या इमारती या तात्काळ पाडणेबाबत आदेश देण्यात यावे.तसेच भारत स्वातंत्र्य होवुन 75 वर्ष होवुन देखील अद्यापपावेतो नंदुरबार जिल्ह्यातील बर्‍याचशा जिल्हा परिषद शाळा ह्या कुडाच्या छपर्‍या,कौलारू छपर्‍यातच भरत आहेत.

यामुळे पावसाळ्यात अश्या कौलारु , कुडाच्या छपर्‍यात भरणार्‍या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत साप,विंचु ,इतर जंगली जनावरे शिरुन येतात यामुळे देखील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका पोहचु शकतो.असाच प्रकार मागीलवर्षी पिंपळखुटा केंद्रातील जि.प.शाळा गारदापाडा ता.अक्कलकुवा येथे घडला.इ.3 री च्या विद्यार्थिनीच्या अंगावर कौलारु छतावरुन साप पडला. परंतु सदर साप हा बिनविषारी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कात्री केंद्रातील जि.प.शाळा नलदापाडा , ता.धडगांव येथे देखील शाळा सुरु असतांना कौलारू छतावरुन साप पडला व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढल्याने विद्यार्थी सुखरुप वाचले.

अश्या घटना कौलारु व कुडाच्या छपर्‍यात भरणार्‍या जिल्हा परिषद शाळेत नेहमी घडत असतात.तरी अश्या कौलारु, कुडाच्या छपर्‍यात भरणार्‍या जिल्हा परिषद शाळांना देखील नवीन इमारती तात्काळ मंजुर करण्यात यावी. यासाठी 63 शाळांनी नविन इमारतीसाठी प्रस्ताव सादर केले. मात्र हे प्रस्ताव एक वर्षापासून धुळखात पडून आहे. यावर जिल्हा परिषद कधी उपाययोजना करेल याबात शिक्षकांमध्ये संभ्रम अवस्था आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 43 शाळांना इमारत नाही तर धडगांव तालुक्यातील 19 जिल्हा परिषद शाळा इमारत नसल्याने या एकूण 62 शाळांनी प्रस्ताव सादर केले आहे. यात धडगाव तालुक्यातील जोमखेडीपाडा, निहानीकमोद, नलदापाडा, गुंडाणचापडा, आमलीपाडा बोराडी, थुंवानी, नळगव्हाण, पळासझाडी, सावर्‍यादिगर, सेलदा, पिंपळचौक, लाठीपाडा, भमाना, शिक्का, निमगव्हाण, अट्टी, इडीपाडा, कुंडापाडा, सावडीपाडा तर अक्कलकुवा तालुक्यातील बापटीपाडा नं. 2, कोठलीचापाडा, पाटीलपाडा, सिनाटपाडा, कुर्‍हाडीपाडा, साणी डोंगरपाडा, अवलीबारपाडा, अंधारीबार, पाटीलपाडा नं. 2, पिमटी, चोपलाईपाडा, बोंडीपाडा, मांडाआंबापाडा,दोराबारीपाडा,वाघबारीपाडा, गारहापाडा, बामणी,रोहयाबारीपाडा, दिवतीपाडा,शेंगालापाणी नं.1,माथाचापडी, बोडीपाडा, जामखुंटपाडा, कुंडाबारीपाडा, घोडमालापाडा, वंजारीपाडा जा. अरेठी, धनखेडी, मणीबेल, हेटाईपाडा,कोराईपाडा, बा. गारदापाडा, मोगरादबारी, जालीबारपाडा, चिमलखेडी, कोठली,डेब्रामाळ, मुखडी, वेलखेडी, मोरखी, डाब गारदापाडा, या शाळांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील 62 शाळा या इमारतीविना आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून या इमारती लवकर मंजूर कराव्यात अशा मागणीसाठी आम्ही खासदार, आमदार, जि.प.सदस्य यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

गोपाल गावीत प्रहार शिक्षक संघटना

Related Stories

No stories found.