मृत बिबटे मोड परिसरातच का आढळतात? पशुप्रेमींना प्रश्न!

बिबटयांचा मुक्तसंचार सुरु असतांना वनविभागाकडून होतेय सोयीस्करपणे दुर्लक्ष
मृत बिबटे मोड परिसरातच का आढळतात? पशुप्रेमींना प्रश्न!

तळोदा Taloda।

तालुक्यातील मोड (mode) गावालगतच्या शेतशिवारात तिसरा बिबट्या (Bibte) मृत अवस्थेत आढळून आल्याने बिबटया मोड येथेच का मृत (Dead) आढळून येतात? असा प्रश्न परिसरातून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, परिसरात ज्यावेळी बिबटयांचा मुक्तसंचार असतो, लोकांना वारंवार त्यांचे दर्शन होते, तक्रारी केल्या जातात, त्यावेळी वनविभागाकडून (Forest Department) उपाययोजना केल्या गेल्या तर बिबटयांच्या जीवावर बेतणार नाही, अशा प्रतिक्रिया पशुप्रेमींमधून व्यक्त करण्यात येत आहेत.

गेल्या दीड महिन्यात मृत बिबट्या आढळल्याची तिसरी घटना आहे. मोड हा परिसर डोंगराळ, गूफांचा, वनराईचा आहे की, मोठमोठ्या वृक्षांचे जंगल आहे? असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होत आहेत. बघता बघता अल्प कालावधीत वनसंपदेतील तीन वन्यजीव संपुष्टात आले असल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर शंकांचे ढग अधिकच गडद होत असून वनविभाग करतो तरी काय? असा संतप्त सवाल पशूप्रेमी जनतेतून व्यक्त केला जात आहे.

पहिला बिबट्या शेताच्या बांधावर मृत अवस्थेत आढळून आला. तेव्हा दोन बिबट्यांच्या भांडणात जखमी झाल्याचे कारण सांगण्यात आले. दुसरा बिबट्या ऊसाच्या शेतात मृत कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचे शवविच्छेदनही करता आले नाही. यावेळी संसर्गजन्य आजाराने मृत झाला असावा असे भासवण्यात आले. आता तिसरा बिबट्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. हा सावजची शिकार करताना पाठलाग करता करता तोंडावर आदळला असल्याने मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तीन बिबटे मेल्याचे दूःख नाही. मात्र ते कसे मृत झाले या तथ्यहिन आधारावर कसे मृत झाले असावे हे जाहीर करण्यात धन्यता मानली जात आहे. एक जिवंत बिबट्या शिकारीच्या जाळ्यात अडकला होता. त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शेतकर्‍यांनी जेव्हा जेव्हा बिबट्या दिसल्याच्या तक्रारी केल्या तेव्हा वनविभागाने काळजीपूर्वक प्रकरण हाताळले असते. त्यांनाही व्यवस्थीत पिंजरा लावून जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असते तर तीन मृत्यूचे पाप वनविभागाच्या डोक्यावर आले नसते.

मोड हे गाव तालुक्यातील सपाटीवरचे गाव आहे. ऊस, केळी, पपई, कापूससारखी पिके घेतली जातात. नैसर्गिक अधिवास करता येईल अशा सूविधांचा पत्ता नाही. बिबटया मोड गावातच का येतात? येतात तर येतात ते मृतावस्थेत का सापडतात? बिबटया मरण्यापूर्वी मोड गावातच का येतात? हा एक अनाकलनीय, रहस्यमयी गूढ प्रश्न आहे. या परिसरात अंधश्रद्धेतून बिबटयाच्या अवयवांचया प्रयोगातून धनवर्षा करण्याचा प्रयत्नातून तर हे प्रकार घडत नाही ना? असे प्रश्न सर्व सामान्यांचा मनात घिरट्या घालत आहेत.

वन संपत्तीचे रक्षण, संवर्धन, जोपासना करण्यासाठी दरमहा लाखोंच्या खर्चावर काम करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. बिबटया दिसला, अस्वल निघाले हल्ला केला असे शेतकर्‍यांनी कळविले की, ही यंत्रणा खडबडून जागी होते. थातूरमातूर कागदी कारवाई केली जाते. कर्मचारी प्रशिक्षित करणार, प्रशिक्षणार्थी मागवणार, हे करणार, ते करणार, असा उसना आव आणून वेळ मारून नेली जाते. दोन दिवस उलटले की, येरे माझ्या मागल्या कूठलेही नियोजन नाही, कागदपत्रे रंगवली जातात. प्रत्यक्षात काही होत नाही. शेतमळ्यात बिबटया दिसल्याच्या तक्रारी दिल्या दिवसापासून व पहिला बिबटया मृत आढळला तेथून इतर बिबट्यांना वाचवण्याचे त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मोहीम राबविली असती तर निसर्ग संपदेचे एवढे मोठे नुकसान झाले नसते. तीन वन्यजीव संपुष्टात आले नसते.

वर्षानुवर्षे शेतकरी तक्रारी करीत आहेत. बिबटे, अस्वलांचे ग्रामस्थांवर अनेक वेळा हल्ले झाले. यावरून परिसरात वन्यजीव, हिस्त्र पशूंचा वावर आहे. हे सर्वश्रुत असताना वनविभागाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. शेतकर्‍यांनी तक्रार केली की, वन कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी पोहोचतात. फोटो सेशन होते. रेकॉर्ड तयार करण्यात धन्यता मानतात.

काल मोड येथे मृत बिबट्या विहीरीत आढळून आला. फोटो पाहिले तर विहीरीत मृत बिबट्या दिसतो. याचा अर्थ विहीर खूप खोल नाही उथळ आहे. म्हणूनच जमीनीवरून काढलेल्या फोटोत बिबट्या दिसतो आहे. उपस्थितांनी जाहीर केले की, सावजचा पाठलाग करताना विहिरीत तोंडावर पडल्याने मृत झाला असावा. कारण तोंड खराब होते. बनावट उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यात कर्मचारी व अधिकारी चतूर आहेत. या आधीच्या मृत बिबट्यांचे शवविच्छेदन अहवाल जनतेसमोर आलेले नाहीत. बिबटे का मृत झालेत याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com