कारवाईच्या भीतीने अनधिकृत बायो डीझेल पंप गायब

बायो डीझेलच्या नावाखाली स्वस्त दरात विक्री होत होते भेसळयुक्त इंधन
कारवाईच्या भीतीने अनधिकृत बायो डीझेल पंप गायब

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

कारवाईच्या भीतीने धुळे जिल्ह्यातील दहिवेल, पिंपळनेर येथील अनधिकृत बायो डीझेल पंप गायब झाले आहेत. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अनधिकृत बायो डीझेल पंप बाबत दैनिक देशदूत मध्ये वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली होती.

नंदुरबार व धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बायो डीझेल पंप थाटण्यात आले आहेत. या अनधिकृत पंपमध्ये बायो डीझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधन स्वस्त दरात विक्री केले जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून वाहने नादुरुस्त होण्याचेही प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील कोठडा व सावरट येथील अनधिकृत बायो डीझेल पंप गेल्या आठवड्यात सील करण्यात आले होते. याबाबत दैनिक देशदूत मध्ये वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली होती.

तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत बायो डीझेल पंप थाटण्यात आले आहेत. याबाबतही वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने धुळे जिल्ह्यातील दहीवेल, पिंपळनेर येथील चार अनधिकृत बायो डीझेल पंप गायब झाले आहेत. सदर बायोडीझल पंप हे सर्व मशीन काढून घेऊन गायब झाले आहे. त्यांना डिझेलचा पुरवठा कोण करत होते ? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. कारवाईचे भीतीने बायोडीझल पंप गायब झाले आहे. याची शासनाने गंभिर दखल घेऊन तातडीने य काळाबाजार व घोटाळ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील सुरू असलेले सर्व बायोडीजल पंप हे केंद्र शासनाचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या 30 एप्रिल 2019 रोजीचे अधिसूचना चे पालन न करता सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर पंप बाबत कार्यवाहीसाठी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेर असोसिएशन व फामपेडा यांनी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नागपूर व नंदुरबार येथे कार्यवाही होऊन काही पंप सील करण्यात आले आहे.

परंतु राज्यात मोठ्याप्रमाणात डीझलचा काळाबाजार होत असल्याचे यातून समोर आलेले आहे. अजूनही दोन्ही जिल्ह्यात अनेक अनधिकृत बायो डीझेल पंप सुरू आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन ने केली आहे.

Related Stories

No stories found.