घरफोडी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक

रोकडसह १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चार घरफोडयांची उकल
घरफोडी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार शहरात दिवसाढवळया घरफोडी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील २ अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथे अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नंदुरबार शहरात केलेल्या चार घरफोडयांची उकल झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील एका आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये ६३ गुन्हे दाखल आहेत तर एका आरोपीला खूनाबाबत १४ वर्ष ३ महिने कारावसही झाला आहे.

याबाबत माहिती देतांना श्री.पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणण्याचे पोलीसांसमोर आव्हान होते. दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी नंदुरबार शहरातील रुख्माईनगर येथे दिवसा किशोर माणिक रौंदळ यांच्या घराचे कुलूप तोडून १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.

स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथील रजनी सुरेश मंगळे यांचे देखील घराचे कुलुप तोडुन २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमंतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेले.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे एमएच -१८ पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले. त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी भरधाव वेगाने आपले वाहन धुळे रोडकडे वळविले.

चारचाकी वाहनाचा पाठलाग करीत असतांना संशयीत आरोपीतांनी दोंडाईचा येथून वाहन सारंगखेडा गावाकडे कळविले व तेथे एका शेतातील झाडाला ठोकले गेल्यामुळे संशयीत आरोपीतांनी त्यांचे चारचाकी वाहन सोडून पळुन गेले.

सदर चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र, कपड्यांची बॅग, दवाखान्याचे कागदपत्र व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे टॅमी हत्यार व इतर साहित्य मिळून आले. श्री.कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करुन

दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक पथक मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ, इंदोर, सिहोर जिल्ह्यात तर एक पथक पुणे येथे संशयीत आरोपीतांचा शोध घेण्याकामी रवाना केले. तसेच नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडीचे दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ, इंदौर, सिहोर, रायसेन, ओबेदुल्लागंज मध्य प्रदेश राज्यात सलग ८ दिवस राहुन संशयीत दोन्ही आरोपीतांचा ठाव-ठिकाणा शोधला, परंतु दोन्ही आरोपी गुन्हा करून मध्य प्रदेश राज्यात आले नाहीत तसेच दोन्ही संशयीत आरोपीतांचे नातेवाईक, इतर साथीदार यांची माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता त्यांनी देखील काही एक उपयुक्त माहिती दिली नाही.

पुणे येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीत आरोपीताच्या पत्नीची माहिती काढून सलग ८ दिवस तिच्या घराच्या आजु-बाजुस वेशांतर करुन बातमीदारांचे जाळे निर्माण केले.

तसेच पथक संशयीताच्या पत्नीच्या घराच्या आजु-बाजुस रात्रंदिवस वेशांतर करुन पाळत ठेवुन संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांचे टोपन नाव होते.

त्याचा फोटो किंवा मोबाईल नंबर नव्हते त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. म्हणून पथकाने मुख्य संशयीताची पत्नी व तिचा एक मित्र अशांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यांना पोलीसी खाक्या दाखवून त्यांना बोलते केले. तरी देखील त्यांनी काही एक उपयुक्त माहिती दिली नाही.

दि.२२ नोव्हेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे येथील बातमीदामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी गोपाळपट्टी, मांजरी याठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

बातमीप्रमाणे मुख्य संशयीत आरोपी त्याठिकाणी सायंकाळी आला, त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालक असा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्ष्यात येताच त्याने त्याठिकाणाहुन पळ काढला.

सापळा लावून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे १ किलो मिटर पाठलाग त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेवून त्यांचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शैलू ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा (वय-४० रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश) असे सांगितले.

त्यास नंदुरबार येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले. त्याच्या दुसर्‍या साथीदाराबाबत विचारपूस केली असता सध्या तो शिक्रापूर जि. पुणे येथे भाडेतत्वावर घर घेवून राहत असल्याचे सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी शैलेंद्र विश्वकर्मा यास सोबत घेवून शिक्रापूर जि. पुणे येथे जावून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता एका छोट्याश्या घरामधून दुसर्‍या संशयीतास ताब्यात घेतले.

त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी) वय-४० रा. राजीव गांधी नगर, सेक्ट-A, एथड, घर नंबर-२२४ अयोध्या रोड, पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना वेगवेगळे बसवून विचारपूस केलीअसता त्यांनी नंदुरबार येथे चोरी केलेला मुद्देमाल दोघांनी मिळुन वाटून घेतला असुन तो त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीतांना सोबत घेवून त्यांच्या घरातुन नंदुरबार येथून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने हस्तगत केले आहे.

ताब्यात घेण्यात आलेला शैलेंद्र विश्वकर्मा यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने नंदुरबार येथे चोरी करण्यापुर्वी संतोषसिंग सोबत संगमनेर जि. अहमदनगर, धुळे शहरात घरफोडीचा प्रयत्न केला होता,

परंतु तो यशस्वी झाला नाही. तसेच यापूर्वी मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथे घरफोडीचे गुन्हे त्याचे भोपाळ, सिहोर मध्यप्रदेश येथील साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. त्याबाबत रेकॉर्ड तपासले असता शैलेंद्र विश्वकर्माविरुध्द घरफोडीचे एकुण ६३ गुन्हे दाखल असून त्यात त्यास अटक देखील झालेली आहे. तसेच संतोषसिंग याचच्यार खूनाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्याने १४ वर्ष ३ महिने भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कारावासाची शिक्षा भोगलेली आहे.

ताब्यात घेण्यात आलेला संतोष विश्वकर्मा यास विचापुस केली असता त्याने गुगल मॅपद्वारे शहराचा शोध घेवून त्याठिकाणी जावून नव्याने तयार झालेल्या वसाहती शोधून एकांत ठिकाणी बंद असलेले एकसोबत ४ ते ५ घराचे कुलूप तोडुन चोरी करायचे व तेथून पळ काढायचा, अशी धक्कादायक माहिती दिली.

दिवसा घरफोडीचे गुन्हे करुन धुमाकुळ घालणारी आंतरराज्यीय टोळीतील शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा, संतोषसिंग सौदागरसिंग (मोने पंजाबी) यांना ताब्यात घेवुन नंदुरबार येथील ४ व इतर जिल्ह्यात देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच्या ताब्यातून १० लाख १० हजार रुपये किंमतीचे २१ तोळे सोनचेे दागिने, चांदीचे दागिने, १५ हजार रुपये रोख, २ हजार रुपये किमंतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किमंतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे अधिक विचारपूस करुन त्यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे, असेही यावेळी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील यांनी सागितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आदी उपस्थित होते.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश वसावे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com