
बोरद | वार्ताहर- TALODA
मोड गावालगत असलेल्या मोड शिवारातील सर्व्हे नं.५/१ या ऊसाच्या शेतात ऊसतोड करीत असतांना ऊसतोड मजूरांना बिबट्याचे दोन बछडे दिसून आल्याने ऊसतोड बंद करुन मजूर गावात पळाले. त्यावेळी गावातून गावकरी व शेतमालक शेतात आले आणि बोरद व तळोदा येथील वन विभागाला याबाबत माहिती दिली.
शेतमालक नवल फकिरा राजपूत यांनी वन विभागाच्या कार्यालयाला दूरध्वनीव्दारे दिली असता लागलीच वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्यासह वनपाल नंदु पाटील, वनरक्षक अमित पावरा, राज्या पावरा, एस.ओ.नाईक आदी वन विभागाचे अधिकारी ऊस तोडणीच्या शेतात हजर झाले.
सर्व परिस्थिती पाहिली असता त्यावेळी त्यांनी दोन जिवंत बछडे दिसून आले. त्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी सांगितले की मादी ही याच पिकाच्या १५ कि.मी.अंतरावर असेल, ती रात्री या दोघा पिल्लांना उचलून नेईल.
तरी कोणीही येथे गर्दी करु नये. चारही बाजूंनी कॅमेरे लावण्यात येतील तेव्हा आपल्याला समजेल की मादीने पिल्ले उचलून नेलेत. या घटनेकडे सर्व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष लागून आहे.
या परिसरात नर-मादी ६ ते ७ असतील. शेतकर्यांनी शेतात जातांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शेतकर्यांनी पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असून मागील महिन्यात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे.