नवापूर येथे दोन अवैध बायोडिझेल पंप सिल

गुन्हे दाखल न केल्याने कारवाईबाबत साशंकता, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी लक्ष देण्याची मागणी
नवापूर येथे दोन अवैध बायोडिझेल पंप सिल

नंदुरबार | दि.२२| प्रतिनिधी NANDURBAR

नवापूर तालुक्यात महामार्गावर थाटण्यात आलेले दोन अनधिकृत बायोडिझेल पंप (Biodiesel pump) महसूल विभागाने सिल केले आहेत. परंतू संंबंधीत पंपचालकांविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून बायोडिझेलचे नमुनेही घेण्यात आले नसल्याने या कारवाईबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री (Collector Mrs. Manisha Khatri) यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नंदुरबार जिल्हयात विना परवाना बायोडिझल पंपचालकांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. नंदुरबार शहर, खापर, नवापूर तालुक्यातील कोठडा, विसरवाडी, नवापूर रेल्वेगेट आदी ठिकाणी बायोडिझलची सर्रासपणे विना परवाना विक्री होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पत्राच्या शेडखाली साधा पंप उभारुन मोठया ड्रममध्ये साठवलेल्या बोगस बायोडिझेलची विक्री सर्रासपणे सुरु आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व तहसिलदारांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे महसूल व पोलीस प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बेडकी ते मोरकरंजा दरम्यान हॉटेल्स, ढाबा व पत्र्यांच्या शेडमध्ये अवैधरित्या सुरु बायोडिझेल पंप थाटण्यात आले आहेत. याठिकाणी हजार ते पाच हजार लिटर क्षमतेच्या साध्या टाक्यांमध्ये बोगस बायोडिझेल साठवण्यात येत आहेत. या टाक्यांना रिडींग मीटर लावण्यात आले असून इलेक्ट्रीक मोटरद्वारे या टाक्यांमधील बोगस बायोडिझेल वाहनांमध्ये टाकले जात आहेत. बाजारभावापेक्षा कमी दरात बायोडिझेल मिळत असल्यामुळे या पंपमधून मोठया प्रमाणावर बायोडिझेलची विक्री होत आहे.

परंतू या टाक्यांमध्ये बायोडिझेल आहे की अन्य कुठले घातक रसायन याबाबत कुठलीही साशंकता नाही. सदर बोगस बायोडिझेलमुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे. मात्र, याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, नवापूर येथील जुनी नवरंग हॉटेलजवळ रेल्वे गेटसमोर व हॉटेल कुणालसमोर उभारण्यात आलेले अनधिकृत बायोडिझेल पंप महसूल विभागाने सिल केले आहेत. याठिकाणी अनधिकृतरित्या टाक्यांमध्ये रसायन साठवण्यात आले होते व त्याची विक्री करण्यात येत होती.

महसूल विभागाने दोन्ही पंप सिल केले असले तरी पंपचालकांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले नाही. रसायनाचे कुठलेही नमुने महसूल विभागाने ताब्यात घेतले नाहीत. एरव्ही पेट्रोल पंप, रेशन किंवा अन्य ठिकाणी कारवाई केल्यास महसूल विभागातर्फे नमुने घेतले जातात. मात्र, याठिकाणी फक्त पंप सिल करण्यात आल्याने महसूल विभागाच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

अशाचप्रकारची कारवाई खापर ता.अक्कलकुवा येथेही काही दिवसांपुर्वी करण्यात आली आहे. परंतू त्यांच्यावरही कुठलाच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी लक्ष घालून संबंधीत अनधिकृत पंपचालकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात बायोडिझेलच्या साठवणूक, पुरवठा व विक्री याबाबत अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने वाहनांना थेट बायोडिझेल विक्री करण्यास मनाई करत नोंदणीशिवाय बायो डीझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करण्यासाठी सुलभ सुविधेसाठी बारा प्रकारच्या परवानगी सह जिल्हाधिकार्‍यांची परवानगी आवश्यक आहे.

परंतु नवापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या बायोडीजल विक्री केंद्र ग्राहकांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले आहे. सदर बायोडिझेल पंपांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. परंतु पुन्हा हे बायोडीजल पंप अवैधरित्या सुरू असून सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नवीन जिल्हाधिकार्‍यांनी सदर अवैध बायोडिझेल विक्री केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी महामार्ग वरील पेट्रोल पंप धारकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com