
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
केंद्र सरकारच्या (Central Government) हर घर नलसे जल या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे (Maharashtra Jeevan Pradhikarana) ग्रामीण पाणीपुरवठा (Rural water supply) कामांना नियोजीत आराखड्यानुसार मंजुरी (Approval) देण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील ७ गावांना दि. २ व ३ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे (Special Gram Sabha) आयोजन करण्यात आले आहे. यात पुढील ३० वर्षांचा गावातील पाण्याचा आराखडा मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरीकांनी विशेष ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना गावित (Dr. Hina Gavit) यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
खा.डॉ. हिना गावित म्हणाल्या, जलजिवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या हर घर नलसे जल या महत्वाकांक्षी योजना असून यात शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरीकाला दिवसाला ५५ लिटर शुध्द पिण्याचे पाणी पुरवण्याचा मानस आहे.
२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पुढील ३० वर्षांसाठी पाण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात लहान, मोठे गावे, नविन वस्त्या, नविन बांधण्यात येणार्या सर्व घरांसाठी पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हा आराखडा तयार झाल्यास पुन्हा त्यात दुरूस्ती करता येणार नाही. हा आराखडा मंजूर करून १५ जानेवारीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी नंदुरबार तालुक्यातील गावांना दि.२ जानेवारी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात वाघोदा सकाळी ९ वाजेला, पातोंडा सकाळी १०.३० वाजता, होळतर्फे हवेली दुपारी १२ वाजता, दुधाळे येथे दुपारी २ वाजता, रनाळे येथे दुपारी ३.३० वाजता, शनिमांडळ येथे सायंकाळी ५ वाजता तर दि.३ जानेवारी रोजी कोपर्ली येथे सकाळी ९ वाजता या गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी खा. डॉ. हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावीत व सर्व संबंधित अधिकारी या सभेस उपस्थित राहणार आहेत.
सदर विशेष ग्रामसभेसाठी गावातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन नियोजीत आराखड्यात काही घरे सुटली असतील, पाण्याच्या उद्भवसंदर्भात काही म्हणणे असेल किंवा आपणास या संदर्भात काही सुचना करावयाच्या असतील तर त्या सभेत मांडाव्यात.
सदर आराखड्याला ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर कोणाचेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही. आपल्या कुटुंबासह गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्नासाठी ३० वर्षांचा आराखडा तयार करण्यासाठी सर्व नागरीक, ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी आ. डॉ. विजयकुमार गावीत उपस्थीत होते.