
मोलगी Molgi । वार्ताहर-
अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील दहेल (Dahel) येथील पांढर्या शुभ्रधारांनी कोसळणारा धबधबा (waterfall) हा सध्या पर्यटकांचे आकर्षण (tourist attraction) ठरत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सातपुड्याच्या डोंगर दर्यांतून अनेक धबधबे प्रवाहीत होतात. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांपासून सर्वच पर्यटक सातपुड्याच्या कुशीत येत असतात. अनेक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालत असतात. त्यातीलच दहेल येथील धबधबे हे पर्यटकांच्या सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरतात.साधारणपणे सातपुड्याच्या मध्य भागात असलेला दहेल गाव हे चारही बाजुंनी डोंगर रांगांनी वेढलेला परिसर आहे.सातपुड्यातून वाहणार्या नदीने व विविध ठिकाणाहून झिरपणार्या पाण्यामुळे दहेल परिसरात एकाच उभ्या डोंगरावर जवळ जवळ अनेक छोटे मोठे धबधबे पांढर्या शुभ्रधारांनी जोरदार कोसळतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा हा दहेलकडे असतो.
दहेल धबधब्याकडे जाण्यासाठी अक्कलकुवा येथून तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग अक्कलकुवा ते साकलीउमर ते सरीमार्गे दहेल येथे पोहोचता येते. या मार्गाचे सुमारे 50 ते 55 किलोमीटर अंतर आहे. दुसरा मार्ग अक्कलकुवा येथून आंबाबारी ते खाई, ओहवा, ओघानीमार्गे दहेल येथे पोहचता येते. तिसरा मार्ग हा खापर, मोरंबा, होराफळी, कोठली, ओघानी असा आहे. चौथा मार्ग हा गुजरात राज्यातील देवमोगरा येथुन येता येते. हे तिन्ही मार्ग थोड्या लांब अंतराचे आहेत.
दहेल परिसरात अनेक धबधबे पाहायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात राज्यातील अनेक पर्यटक दहेल येथे वनभोजन आणि पर्यटनासाठी गर्दी करतात.
दहेल येथील धबधबा जितका सुंदर दिसतो तेवढा निष्काळजी आणि हुल्लडबाजी करणार्या पर्यटकांसाठी जीवघेणा होऊ शकतो. कारण सरळ उताराची डोंगर असल्याने या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही संसाधने नाहीत. परिसरात जोरदार वारे वाहत राहतात. त्यामुळे पर्यटकांना डोंगर काठावर आवश्यक काळजी घेण्याची गरज असते. धबधबा पाहण्यासाठी पश्चिम दिशेकडे मोकळे पटांगण आहे. मात्र त्याच्या बाजुने कोसळणार्या धबधब्याचे उसळते रुप कॅमेर्यात कैद करण्यासाठी धोकेदायक असणार्या डोंगरातून सुमारे 150 मीटर पायपीट करावी लागते.