
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
नवापूर (Navapur) येथील लॉकअप (lockup) तोडून पळालेल्या तीन गुन्हेगारांना पोलीसांनी (police) औरंगाबाद जिल्हयातून अटक केली आहे. त्यामुळे आता पाचही आरोपी पुन्हा जेरबंद झाले आहेत.
दि.५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री सव्वाच्या सुमारास नवापूर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणार्या रस्त्यावर हैदरउर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण (वय-२० वर्ष,रा.कुंजखेडा, ता.कन्नड जि. औरंगाबाद),
इरफान इब्राहिम पठाण (वय३५), युसूफ असिफ पठाण (वय २२), गौसखॉ हानिफखॉ पठाण (वय-३४), रा.ब्राम्हणी गराडा ता.कन्नड जि.औरंगाबाद), अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (वय-२२ रा.कठोरा बाजार ता.भोकरदन जि.जालना) हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना
स्कार्पिओ मोटार गाडी (एमएच १३ एन ७६२६) वाहनासह मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सकाळी ६.४५ वाजता अटक करण्यात आली होती.
परंतु दि.५ डिसेंबर २०२२ रोजी ९.०५ च्या सुमारास सर्व आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून पलायन केले होते. सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने व
दि.८ डिसेंबर २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकीलखॉं ईसमाईलखॉं पठाण यास मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गावाच्या जंगलातून पकडण्यात यश आले.
उर्वरित तीन फरार आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सारख्या तालुक्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी गौसखॉं, युसुफ पठाण, इरफान पठाण यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढले.
दि.२८ डिसेंबर २०२२ रोजीच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीतांच्या गावालगत असलेल्या जंगलातील शेतात गौसखॉं, युसुफ पठाण, इरफान पठाण हे लपून बसले असल्याची बातमी मिळाल्याने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे
व त्यांच्या पथकाने ब्राम्हणी गराडा गावाच्या बाहेर असलेल्या जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला. कुत्रे भूंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून तीन इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्या तिघांना करुन अटक करण्यात आली. त्यामुळे नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या पाचही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी अथक परीश्रम घेवून पुन्हा जेरबंद केले आहे.
दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नवापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ तसेच नवापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.