‘थर्टी फर्स्ट’च्या ओल्या पार्टीसाठी लावलेल्या जाळयात बिबटया अडकला

वन्य प्राण्याच्या रक्षणासाठी शिकार कोण रोखणार? घटनेनंतर परिसरात चर्चांना उधाण
‘थर्टी फर्स्ट’च्या ओल्या पार्टीसाठी लावलेल्या जाळयात  बिबटया अडकला

दत्तात्रय सूर्यवंशी

तळोदा | TALODA

थर्टी फर्स्टच्या (Thirty first) ओल्या पार्टीसाठी (Wet party) वन्यप्राणी (Wildlife) पकडून मेजवानी (Feast) करण्याच्या प्रयत्नातून सापळा (Trap) लावल्याची कुजबूज परिसरात ऐकायला मिळत आहे. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी शिकार (Hunting) रोखणार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

तळोदा तालुक्यातील आमलाड, बोरद, मोड परिसरात शेतात दोन बिबट्यांचे मृत शरीर आढळून येणे, सापळ्यात बिबटया अडकून राहणे, यामागे वन्यजीव तस्करीचा गोरखधंदा करणारे तर नसावेत ना?

वर्षानुवर्षे वन्यजीवांची शिकार करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना डोंगरभागातील विश्रामगृहात मेजवानी करण्याचा शिरस्ता आहे. हल्ली मोबाईल, सोशल नेटवर्किंग यामुळे या घटनांवर उघड उघड करण्यावर आळा बसला आहे. चोरून असे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होत असतो.

परिसरात ससे, तितर, घोरपड, रानडुक्कर, कोल्ह्याचे पिल्लू पकडण्यासाठी सापळे लावण्यात येतात. वनलगतच्या गावामध्ये प्राण्यांच्या शिकारीचे काम गावातील रिकामे लोक नेहमीच करत आले आहेत.

याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सातपुड्यात अनेक जंगली प्राण्यांची शिकार होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची शिकार रोखणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तळोदा तालुक्यातील शेतमळे, नदीनाल्यात अनेक वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. येथील जंगलांमध्ये बिबट्या, तरस, लांडगे, रानडुक्कर, कोल्हा, ससे, घोरपड, तितर असे अनेक वन्यजीव तसेच प्राणी आढळून येतात. या प्राण्यांची सर्रास शिकार करून मांसाहार केला जातो.

वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आपल्या विभागांतर्गत होणार्‍या प्लॅटेशन, वृक्षारोपणाचे खड्डे, रोजगार हमी योजनेची कामे यांच्यात जेवढा रस घेतात तेवढा रस वनरक्षण, वन्यजीव संरक्षण, वनसंपत्तीची सूरक्षा याबाबतीत उदासीनता असते.

विभागाचे अधिकारी शिकार केल्याप्रकरणी व जंगलतोड केल्याप्रकरणी नागरिकांना पकडतात. मात्र, शिकार होऊच नये व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. ग्रामीण भागात लाहोर्‍या, तितर, ससे, कोल्हा यासह रानडुकरांची शिकार करून त्याच्या मांसाची विक्री केली जाते,

किंवा पकडणारे पाच दहा शिकारी मिळून वाटे-हिस्से करून घेतात. याची माहिती वन विभागाला नसावी हे न समजण्यापलीकडचे कोडे आहे. या शिकार करणार्‍या लोकांवर वनविभागाच्या कर्मचार्‍यांचा वरदहस्त असल्याचे देखील बोलले जाते.

अशा या कृत्यात वनविभागाचे कर्मचारीही आपले हात ओले करत असल्यामुळे शिकार्‍यांवर कारवाई करणे अनेकवेळा यंत्रणेकडून टाळले जाते. शहरालगतच्या भागातच शिकार होत असताना अधिकारी नेमके काय करतात? तसेच मुद्दामहून शिकार्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे काय? असा प्रश्‍नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तळोदा तालुक्याच्या जवळपास सर्व भागात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. २ बिबटे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील १५ दिवसात घडली आहे. त्यानंतर चिंमट्यात बिबट्या अडकलेला आढळून आला.

या घटनेनंतर या परिसरात वन्यप्राण्यांची शिकार होते याला पूष्टी मिळते. असे मत स्थानिक नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. चिमट्यात बिबट्याचा पाय अडकल्यामुळे बोरद वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांची ि्शकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

थर्टी फर्स्टला सर्वत्र पार्टी असतात. त्याच लालसेतून ससे, तितर, घोरपड, कोल्हा पकडण्यासाठी सापळा लावला गेला असावा अन् अडकला बिबट्या. यामुळे वन्यप्राण्याची शिकार करणार्‍यांचे पितळ उघडे पडले असे म्हटले जाते.

बिबट्या वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्‍यात कधी कैद झालाच नाही, मृत बिबट्या सापडला तर झटापटीत मेला, वय जास्त झाल्याने मेला असावा, रोगराईने मृत झाले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी संबंधित सर्वच घटनांना उलट जवाब देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

अशा प्रकारच्या गांभीर्याने घडणार्‍या घटना पाहता वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावरच जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com