टीईटी घोटाळा : घरातच शैक्षणिक कागदपत्रे तयार करणारा दोंडाईचातील ‘तो’ डी.एम.कोण?

टीईटी घोटाळा : घरातच शैक्षणिक कागदपत्रे तयार करणारा दोंडाईचातील ‘तो’ डी.एम.कोण?
USER

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

टीईटी परीक्षेतील (TET scam) घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलीसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी बाहेर येवू लागल्या आहेत. नंदुरबार, धुळे व जळगाव या तीनही जिल्हयात शिक्षण विभागातील (Department of Education) एजंटांचा (Agents) सुळसुळाट वाढला आहे. मात्र, तीनही जिल्हयांमध्ये संबंध असलेला व जिल्हास्तरापासून उपसंचालक, आयुक्त तसेच मंत्रालयस्तरावर सर्व प्रकारची शैक्षणिक तसेच इतर कामे करणारा एक बडा एजंट (दोंडाईचा ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील एका नामांकीत संस्थेतील कनिष्ठ महाविद्यालयात (junior college) कार्यरत आहे. त्याचीही चौकशी केल्यास अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना टीईटी घोटाळयाप्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्या एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून दैनिक देशदूतमध्ये याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात येत असल्याने शैक्षणिक क्षेत्रासह इतर अनेक लोकांनी शिक्षण क्षेत्रात चालत असलेल्या गैरप्रकार, गैरव्यवहाराबाबत माहिती उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे एक ना अनेक गुपिते आता बाहेर येवू लागली आहेत.

नाशिक विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्या आधीपासूनच दोंडाईचा येथील एका नामांकीत शैक्षणिक संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ‘डीएम’ नामक शिक्षकाने उच्छाद मांडला आहे. नवीन शाळांना, तुकडयांना मंजूरी घेणे, त्यांना मान्यता मिळवून देणे, अनुदान मिळवून देणे, शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे अ‍ॅप्रोव्हल काढून देणे, यात त्याचा हातखंडाच आहे. अर्थात खालून वरपर्यंत ‘टक्केवारी’ची पद्धत असल्याने हे सर्वकाही सहज शक्य होत आहे.

एवढेच नव्हे तर हा डीएम एखाद्याची शैक्षणिक पात्रता असतांना किंवा नसतांनाही ‘बॅकडेटेड’ अ‍ॅप्रोव्हल काढून तगडा वेतन फरक काढत असून पगारही नियमीत सुरु करुन देत आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारची कागदपत्रे तो आपल्या घरीच तयार करतो, फक्त नाशिक किंवा पुणे किंवा जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहया त्यावर घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जातो. एवढे सगळे करत असतांना त्याच्यावर निश्चितच कोणाचा तरी वरदहस्त आहे. त्यामुळेच तो कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनापेक्षा इतर रिकामे कामे करण्यात व्यस्त असतो. त्याची याबाबत चौकशी केल्यास टीईटी घोटाळाच काय इतरही अनेक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हॉटस् अ‍ॅप गृपमधून ‘एजंट’ झाले ‘लेफ्ट’

दरम्यान, ज्या दिवशी तुकाराम सुपे यांच्यावर कारवाई झाली, तेव्हापासून नंदुरबारसह इतर जिल्हयातील त्यांच्या ‘एजंटांनी’ आपले मोबाईल क्रमांक बदलले असून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, शिक्षण विभागाशी संबंधीत व इतर काही व्हॉटस्अ‍ॅप गृपमधून ते ‘लेफ्ट’ झाले आहेत. त्यांनी दुसरा मोबाईल क्रमांक घेतला असून तो क्रमांक या व्हॉटस् अ‍ॅप गृपमध्ये पुन्हा ‘अ‍ॅड’ केल्याचे समजते. पुणे येथील डायरीत त्यांचे मोबाईल क्रमांक असल्यानेच त्यांनी मोबाईल क्रमांक बदलल्याची चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.