टीईटी घोटाळा : पैसे परत मागण्यासाठी उमेदवारांचा तगादा

एजंटांनाच आता ‘परीक्षा’ देण्याची वेळ
टीईटी घोटाळा : पैसे परत मागण्यासाठी उमेदवारांचा तगादा

नंदुरबार । Nandhurbar। प्रतिनिधी

टीईटी परीक्षेतील (TET scam) घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner Tukaram Supe) यांना पोलीसांनी अटक केल्यानंतर नंदुरबारसह शेजारील धुळे जिल्हयातील त्यांच्या एजंटांमध्ये (Agents) खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर ज्या उमेदवारांनी (candidates) त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी पैसे देवून ठेवले आहेत, तेच उमेदवार आता पैसे परत मागण्यासाठी (ask for a refund) त्यांच्याकडे तगादा लावत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिणामी एजंटांनीही पुण्याशी संपर्क साधून ‘आता काय करायचे’ अशी विचारणा केल्याचे समजते. त्यामुळे आता एजंटांवरच ‘परीक्षा’ देण्याची वेळ आली आहे.

दि.17 रोजी पुणे येथील पोलीसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी पैसेे घेतल्याची कबुलीही दिल्याचेही समजते. याशिवाय त्यांच्या घरात टीईटीचे ओळखपत्रही सापडले आहेत. या सर्व घोटाळयात एकटे अधिकारी सहभागी नसून प्रत्येक जिल्हयात, गावात त्यांचे एजंट कार्यरत आहेत. या एजंटांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी उमेदवारांकडून एक ते तीन लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. मात्र, आता मुख्य सुत्रधारालाच अटक करण्यात आली असल्याने एजंटांसह संबंधीत उमेदवारांचेही धाबे दणाणले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार ज्या उमेदवारांनी टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी एजंटांना पैसे दिले आहेत, तेच उमेदवार आता पैसे परत मिळविण्यासाठी एजंटांकडे तगादा लावत असल्याचे समजते. मात्र, काही एजंट शहर, जिल्हा सोडून इतरत्र ‘गायब’ झाले आहेत. काही देवदर्शनाला गेले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांना त्यांचे पैसे परत मिळतील की नाही? एजंट त्यांची समजूत कशी काढतात? संबंधीत उमेदवार टीईटी उत्तीर्ण होतील काय? की टीईटी परिक्षाच रद्द होईल? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, उमेदवार एजंटांकडून पैसे मागत असल्याने एजंटांनी आता पुण्याशी संपर्क सुरु केला असून ‘आता काय करायचे’ असा प्रश्न उपस्थित करत असल्याचे समजते. त्यामुळे आता टीईटी उमेदवारांपेक्षा एजंटांनावरच ‘परीक्षा’ देण्याची वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे आता संबंधीत विभागाने या संपुर्ण घोटाळयात सहभागी असलेल्या सर्वच घटकांची साखळी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com