अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला...!

तळोदा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश
भरत माळी
भरत माळी

चेतन इंगळे

मोदलपाडा, ता.तळोदा TALODA

तळोदा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी, स्विकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या २१ मार्च रोजी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

संजय माळी
संजय माळी

तळोदा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. दिनांक २१ मार्च रोजी मुंबईत भाजपा पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा शक्ती प्रदर्शन करून करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रवेशामुळे तळोदा तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा प्रवेश हा शक्ती प्रदर्शन करत होणार असल्याने तालुक्यातील मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या मुंबई येथील प्रवेश सोहळयाला हजेरी लावणार आहेत. आ.राजेश पाडवी यांनी आ.अमरीशभाई पटेल यांची या संदर्भात दोन दिवसापूर्वीच भेट घेतली होती. त्यावेळी प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे समजते.

जितेंद्र सूर्यवंशी
जितेंद्र सूर्यवंशी

गळती रोखण्याचे काँग्रेस श्रेष्ठींसाठी आव्हान

काही महिन्यांपूर्वी काँगेसचे नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी यांनीदेखील बीजेपीमध्ये प्रवेश केला होता. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी सुद्धा काँग्रेसमधील दुफळी व समन्वयाचा अभाव जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक यांनी थेट उपाध्यक्ष पदावर मुसंडी मारुन काँग्रेसला झटका दिला. या अनुषंगाने जिल्ह्यातील काँग्रेसची गळती काँग्रेसच्या नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. यापुढेही गळती रोखण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर आहे.

तळोदा तालुक्यातील काँग्रेसचे बरेच नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, संजय माळी,जितेंद्र सूर्यवंशी हे भाजपात प्रवेश करत असल्याने तालुक्यातील राजकारणात चर्चेचा आणि काँग्रेससाठी धक्कादायक निर्णय असल्याचे मानले जात आहे. यामुळे येणाऱ्या तळोदा पालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकच शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे.

माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या जेष्ठ बंधुंचे पुत्र असणारे जितेंद्र माळी (सूर्यवंशी) हे सध्या स्वीकृत नगरसेवक असून  त्यांना भाजपकडून मागील पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांनी नगराध्यक्ष पदासाठी आमंत्रण दिले होते. मात्र जितेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचे काका व अनुभवी राजकारणी असणारे माजी नगराध्यक्ष भरत माळी सांगतील तोच निर्णय अंतिम असेल असे सांगत निर्णय घेतला नाही. मात्र मागील पाच वर्षात तळोदा शहर काँग्रेसमध्ये लागलेली गळती तसेच निरुत्साही वातावरण पाहता जितेंद्र सूर्यवंशीच नाही तर जेष्ठ नेते भरत माळी व जेष्ठ नगरसेवक संजय माळी यांच्या प्रवेशाचीदेखील चर्चा शहरात  मागील कित्येक दिवसापासून सुरू होती. राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ हिना गावित, आ. राजेश पाडवी यांच्या वाढत्या भेटीमुळे त्यांची भाजप प्रवेशाबाबत चर्चा होती. मात्र नंतर पुन्हा चर्चा थांबली होती. आता 21 तारखेला त्यांच्यासह सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच भरत माळी यांचे समर्थक, ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, जिल्हा बँकेचे , मार्केट कमिटीचे संचालक, आजी माजी समर्थक, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन आदी शेकडो जण भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com