‘सुया घे पोत घे.. काहीच घ्यायचे नसेल तर मग लस तरी घे’ लोकगिताने उडविली धम्माल!

युवारंग युवक महोत्सव
‘सुया घे पोत घे.. काहीच घ्यायचे नसेल तर मग लस तरी घे’ लोकगिताने उडविली धम्माल!

नंदुरबार - NANDURBAR

कोरोनानंतरची आलेली शिथिलता झटकून युवक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हजारो तरुणाईने आपल्या कला प्रचंड उत्साहात सादर करून नवचैतन्य निर्माण केले.

उत्तर महाराष्ट्रातील १०७ महाविद्यालयातील तब्बल १०८८ विद्यार्थ्यांच्या युवारंग युवक महोत्सवाला (Yuvarang Yuvak Mahotsavala) उद्घाटनानंतर सकाळी ९ वाजता सुरूवात झाली. पहिला दिवस मिमिक्री व विडंबननाट्य कलेने गाजला. सकाळच्या पहिल्या सत्रात खुला रंगमंच क्र.१ वर (स्वा.से.अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच) मिमिक्री हा कला प्रकार सादर करण्यात आला.

रंगमंचावर कलाकारांनी विविध क्षेत्रातील नामवंत राजकीय नेते, अभिनेते यात १५ संघानी सहभाग नोंदवून कला सादर करीत युवारंगाची दमदार सुरूवात केली. विद्यार्थी कलाकारांनी आपल्या आवाजातून बॉलिवूड कलावंत नाना पाटेकर, अमरीशपुरी, सनी देओल, अजय देवगण आदी तर राजकीय नेत्यांमधून मोदी, शरद पवार, नारायण राणे यांचे आवाज हुबेहुब साकारून धमाल मिमिक्रीतून विद्यार्थी कला सादर केली.

मिमिक्रीतून अभिनेत्यांचे डायलॉग, शेरोशायरीने उपस्थित तरुणाईला मोहित केले. अनेकांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची टोलेबाजी सुरेख सादर केली. विविध प्राण्यांचे आवाज हे धमाल उडवून देणारे ठरले.

याच रंगमंचावर दुपारी ४ वाजता विडंबननाट्य स्पर्धा सुरू झाली. यात २३ पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेतला तृतीयपंथीयांची व्यथा, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांचे होणारे शोषण, होणारी अवहेलना या विडंबन नाट्याने प्रेक्षकांची दाद मिळविली.

स्त्रीयांवरील अत्याचार, मानवीवृत्तीचे असंख्य कंगोरे दर्शविणार्‍या विडंबन नाट्यांनी उपस्थिताना चिंतन करण्यास भाग पाडले.

सामाजिक विषयांवर चर्चा घडवून आणणार्‍या विडंबन नाट्याच्या स्पर्धेत अंधश्रध्दा, महिला सुरक्षा, विदूषक या नाट्यांनी रंगत आणली. रात्री उशिरापर्यंत कला सादर करत होते.

बंदिस्त रंगमंच क्र.२ (बालहुतात्मा शिरीषकुमार रंगमंच)

भारतीय लोकगीत कला प्रकारात ३१ संघानी आपले सादरीकरण केले. तबल्याचा ठेका आणि हार्मोनियमच्या सुरात आपल्या सुरांची मिसळण करीत विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी कलाकारांनी सादर केलेल्या भावमधुर लोकगीतांनी प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली.

एकापेक्षा एक भारतीय लोकगीते सादर करीत जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण महाविद्यालयीन तरूणाईने संगीत क्षेत्रात अविष्कार घडविला. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानावर, सुया घे पोत घे.. आणि जर काहीच घ्यायचे नसेल तर मग लस तरी घे, या लोकगीतांनी तर धमाल केली. भारूड, पोतराज गीत, गवळण आदी लोकगीत प्रकार सादर केले.

बंदिस्त रंगमंच क्र.३ (हुतात्मा लालदास शहा रंगमंच)

काव्यवाचन या कला प्रकारात ६० संघानी बाप, शोषिकपण, शेतकरी, यशाचा संघर्ष, प्रेम, दुष्काळ, बहिणाबाई, मन, आई, स्त्री, स्वातंत्र्याचा महोत्सव, पुरोगामी विचार, स्त्री स्वतंत्र झाली का? वेश्या, कोरोना, मोबाईल वेड, शिक्षण या विषयांवर काव्यवाचन करून वातावरण धीरगंभीर केले.

स्पर्धकांनी कवितांच्या माध्यमातून मत व भावना मांडतांना विविध विषयांना स्पर्श केला. सबसे असफल, सबसे कमजोर, हमारी शिक्षा प्रणाली, देश स्वातंत्र्य झाला स्त्री स्वातंत्र्य झाली का? विद्यार्थ्यांच्या या काव्यवाचनाला मनसोक्त दाद मिळत गेल्याने त्यांच्या हुरूपही वाढला होता.

बंदिस्त रंगमंच क्र.४ (वीर भगतसिंग रंगमंच)

शास्त्रीय वादन या कला प्रकारात सुरवाद्यमध्ये बासरी व हार्मोनियम वादनात ६ संघानी आपली कला सादर केली. तर तालवाद्य मध्ये १६ संघांनी मृदूंग, पाखवाज, तबला आदी वाद्य वादनात कला सादर केली.

बंदिस्त रंगमंच क्र.५ वर (वीर बिरसामुंडा रंगमंच)

रांगोळीतून समाजप्रबोधनाचे धडे दिले. संविधानाचे महत्व, माझी वसुंधरा, कोरोना, जनजागृती, स्वच्छ भारत, सर्वधर्म समभाव, पाणी वाचवा हे विषय हाताळण्यात आले. यातही समाजप्रबोधनाचे वेगळेपण या रांगोळी स्पर्धेचे वेगळेपण दर्शवत होते. रांगोळी स्पर्धेत ५३ संघ सहभागी झाले होते.

दुपारी व्यंगचित्र स्पर्धेत २६ संघांनी आपली कला प्रदर्शीत केली. यात सामजिक विषमता, महागाई, ऐतिहासीक घटना, आधुनिक समस्या, कोरडा दुष्काळ, अंधश्रध्दा, सोशल मिडीया या विषयावर व्यंगचित्राद्वारे भाष्य केले.

रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता तरूणाईचा सराव

पूज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेल्या युवारंग महोत्सवाचे आज सकाळी शानदार उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांना सादर करण्यास सुरुवात केली.

आपली कला सर्वोत्कृष्टपणे सादर झाली पाहिजे, यासाठी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता महाविद्यालयाच्या परिसरातील डेरेदार वृक्षांच्या छायेखाली सराव सुरू केला. यातून त्यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी दृष्टीस पडली.

युवारंग अर्थात युवक महोत्सव म्हटला म्हणजे जल्लोष तर आलाच.. विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाने निर्माण केलेले भविष्यात उत्कृष्ट कलाकार निर्माण करण्यासाठीचे व्यासपीठ.

त्याच्या उपयोग करीत तरुणाई कला सादर करण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. युवारंग म्हणजे सर्व कलायुक्त कलाक्षेत्र सर्व प्रकारच्या कलांना सादर करण्यासाठी येथे वाव मिळतो.

यावर्षी विद्यापीठाकडून प्रथमच सहभागी विद्यार्थ्यांकडून गुगलद्वारे फिडबॅक फार्म भरून घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.