जिल्हयात रविवारी टीईटी परीक्षा

११ हजार ५२ परीक्षार्थी प्रविष्ट होणार
जिल्हयात रविवारी टीईटी परीक्षा
File Photo

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे (Maharashtra State Examination Council Pune) यांच्या वतीने दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test) २०२१ चे आयोजन (Organizing) करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवर एकूण ११ हजार ५२ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.

परीक्षा आयोजनासाठी गठीत जिल्हा संनियंत्रण समितीच्या प्रमुख जिल्हाधिकारी मनिषा खत्री तसेच सहप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी केले आहे.

समिती सदस्य पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, प्राचार्य डायट डॉ. जगराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम आहेत तर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी सदस्य सचिव व परीक्षा नियंत्रक म्हणून कामकाज पाहणार आहेत.

दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून पेपर क्र. १ ला १९ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ९१ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत. तर पेपर क्र. २ चे आयोजन १३ केंद्रांवर करण्यात आले असून एकूण ४ हजार ९६१ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

परीक्षेसाठी ८५० अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम तसेच प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांचे भरारी पथक असून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा परिरक्षक म्हणून सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील कामकाजाचे सनियंत्रण करण्यासाठी विस्तार अधिकारी-शिक्षण आणि केंद्रप्रमुख यांना सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण कामकाज पाहणार असून परीक्षा समितीचे सहनियंत्रक म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा संप विचारात घेता परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्यासाठी परीक्षार्थ्यांनी आधीच नियोजन करावे. उशिरा येणा-या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याने सकाळ सत्रात १० वाजेच्या आधी तर दुपार सत्रात १.३० वाजेच्या आधी परीक्षा केंद्रांवर पोहचावे असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com