एक वर्ष ऊसाचा पेरा बंद करणार : अभिजीत पाटील

प्रकाशा येथील शेतकरी मेळाव्यात तीन ठराव पारित
एक वर्ष ऊसाचा पेरा बंद करणार : अभिजीत पाटील

शहादा Sahada। ता.प्र.-

परिसरातील शेतकर्‍यांचा सहकारी साखर कारखाना खाजगी झाला, दूध संघ बंद पडले, सहकार क्षेत्र (Cooperative sector) मोडकळीस आले आहे. याला असंघटित शेतकरी (Unorganized farmers) जबाबदार आहेत. जोपर्यंत आपण एकत्रित येऊन लढत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. कोणत्याही पक्षाचा विचार करण्यापेक्षा आम्ही शेतकरी आहोत याचा अगोदर विचार करा. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना (sugar factories) ऊस दरवाढीबाबत (Sugarcane price hike) निवेदन देण्यात येईल, योग्य भाव (right price)न मिळाल्यास ऊस तोड बंद करु. प्रसंगी एक वर्ष ऊसाचा पेरा बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागेल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या (Farmers Struggle Committee) वतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील (Former Chairman of Zilla Parishad Abhijit Patil) यांनी शेतकरी मेळाव्यात दिला.

प्रकाशा (ता.शहादा) येथील अन्नपूर्णा देवी मंदिराच्या प्रांगणात शेतकर्‍यांना उद्भवत असलेल्या विविध प्रश्नांबाबत विचार विनिमय व न्याय मिळवण्यासाठी पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात श्री.पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. श्री पाटील पुढे म्हणाले की, पूर्वी शेतकरी संघटित होता. आता विखुरला गेला आहे. अन्यायाविरुद्ध शेतकर्‍यांनी आवाज उठवला नाही. न्याय मिळविण्यासाठी सनदशीर मार्गाने आवाज उठवला पाहिजे. उसाचा योग्य दर मिळवण्यासाठी साखर कारखान्यांना आठ दिवसांची मुदत देऊ, आपल्याला राजकारण करायचे असते तर आपण निवडणूक बिनविरोध होऊ दिली नसती. शेतकर्‍यांचा शेतमाल, वायर, सबमरसिबल, मोटर चोरीला जाते यासाठी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

फळ उत्पादक संघ गरजेचा

जिल्ह्यात केळी, पपई या फळ पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु व्यापारी वर्ग मनमानी करत कमी दरात उत्पादित मालाची खरेदी करतात. दराबाबत प्रत्येक वेळी शेतकर्‍यांना संघर्षच करावा लागतो. व्यापार्‍यांवर कोणताही वचक नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीचीही काही जबाबदारी आहे. पण ते घेत नाहीत. पपई, केळी उत्पादक शेतकरी एकत्र येऊन फळ उत्पादक संघ स्थापन केला तर नक्कीच न्याय मिळेल.

संघर्षाशिवाय शक्य नाही

सुरुवातीला प्रकाशा येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले की, बाहेरील व्यापारी आपला दर ठरवितो ही शोकांतिका आहे. कारखानदारांनी शेतकर्‍यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, संघर्ष केला तर गुजरातचा कारखान्यांनी पैसे दिलेत, आपण कष्टाने पिकवितो आणि दर दुसरे ठरवितात. शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाली पाहिजे. शेतात शेतकर्‍यांचे वस्तू चोरीला गेले तर त्याचा गुन्हा स्वतः शेतकर्‍यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाखल केला पाहिजे, असे यांनी सांगितले.

मुख्य तीन ठराव

यावेळी या शेतकरी मेळाव्यात मुख्य तीन ठराव करण्यात आले. त्यात लवकरच जिल्ह्यातील तिघा ऊस कारखान्यांना भाव वाढीसंदर्भात निवेदन देणे, पपई, केळी सारख्या फळ पिकांसाठी फळ उत्पादक संघ स्थापन करणे, गावागावांमध्ये शेतकरी संघर्ष समिती स्थापन करणे, येत्या पंधरा दिवसात संघ स्थापन झाल्यानंतर लवकरच पुढची दिशा ठरविली जाणार असल्याचे ठरविण्यात आले.

यावेळी निरज पाटील (तळवे), गुलाबसिंग गिरासे (बोरद), भगवान पाटील (जयनगर), डॉ. किशोर पाटील (सुलतानपूर),पुरुषोत्तम चव्हाण (मोड), पांडुरंग चौधरी (वडाळी), अभय गोसावी (वडाळी), मुकेश पाटील (शहादा) आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत अनेक वक्त्यांनी आपले अनुभव मांडले यावेळी शेतकरी हितासाठी अभिजीत पाटील, हरी दत्तू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी संघटित होण्याची गरज असल्याचे उपस्थितांमधून सुर उमटला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आय.डी.पटेल यांनी केले. प्रास्ताविक हरीभाई दत्तू पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com