
नवापूर | श.प्र.- NAVAPUR
तालुक्यातील चरणमाळ घाटात (Charanmal Ghat) आज सकाळी गुजरात (Gujarat) परिवहन मंडळाच्या बसचा रॉड तुटल्याने (accident) बस घाटाखाली उतरली. या अपघातात सात ते आठ जणांना जबर मार लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चरणमाळ घाटात आज सकाळी १०.३० च्या सुमारास मालेगाव-सुरत या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बस (क्र.जीजे १८ झेड ५६५०) चा पुढील भागातील रॉड तुटल्याने बस घाटाच्या खाली उतरली.
या बसमध्ये २८ प्रवासी होते. यात ७ ते ८ प्रवाशाना जबर मार लागला. त्यांना १०८ रुग्णवाहिकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात बसचे चालक लक्ष्मणसिंग बलवत रणावत व वाहक विलास भाऊजीभाई वसावा- छापटी उच्छल सुरत डेपो वय ४८रा यांना पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळताच उपनिरीक्षक मनोज पाटील, पोहेकॉ गणेश बच्छे, विनोद पराडे, प्रतापसिंग वसावे, प्रमोद वंजारी, नामदेव राठोड व पोलीस पाटील बोरझर यांनी जखमींना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेत टाकले.
चरणमाळ घाटात २ दिवसात ही दुसरी घटना आहे. नवापूर तालुक्यात दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर ओलावा निर्माण झाल्याने वाहनाचे ब्रेक लागत नाही.
या बसमधील प्रवासी धमाबाई वाघ रा.सुरत, सोनी अजय मोरे रा.पिंपळनेर, नजमा मुळताक अहमद (वय ३७, रा.मालेगाव), गुलामनबी होरा (वय ८४, रा.बडोदा), जुबेदा गुलामनबी होरा (वय ८०, रा.बडोदा), हिना कौसल लयत अहमद (वय २५, रा.मालेगाव),
शहा शफिक दादामीया (वय ४३, रा. कुंसुबारोड मालेगाव), सलिम शहा इसाक (वय ६२, रा. सामोडे पिंपळनेर) हे सात प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप गावीत, सिस्टर निर्मला गावीत, जोयस वळवी, तेजल गावीत, सिमा वळवी, हेमलता जाधव यांनी उपचार केले.