कोठडा शिवारातील श्रीश्री बायोडिझेल पंप दुसर्‍यांदा सिल

महसुल विभागासह पोलीसांनी केला सील
कोठडा शिवारातील श्रीश्री बायोडिझेल पंप दुसर्‍यांदा सिल

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नवापूर (Navapur) तालुक्यातील कोठडा गावाच्या शिवारात राष्ट्रीय महामार्गावर असलेला शैलेद्र पुरणमल अग्रवाल यांच्या मालकीचा श्रीश्री बायोडीझेल पंप (Sri Sri Biodiesel Pump) महसुल विभाग व पोलिस प्रशासनाने (Police) सिल केला आहे. ही कारवाई काल दि.२५ जुलैला रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत दैनिक देशदूतने दि.२३ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेवून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हाच बायोडिझेल पंप दुसर्‍यांदा सिल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हयात विना परवाना बायोडिझल पंपचालकांचा पुन्हा सुळसुळाट वाढला आहे. नंदुरबार शहर, खापर, नवापूर तालुक्यातील कोठडा, विसरवाडी, नवापूर रेल्वेगेट आदी ठिकाणी बायोडिझलची सर्रासपणे विना परवाना विक्री होत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पत्राच्या शेडखाली साधा पंप उभारुन मोठया ड्रममध्ये साठवलेल्या बोगस बायोडिझेलची विक्री सर्रासपणे सुरु आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व तहसिलदारांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे महसूल व पोलीस प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बेडकी ते मोरकरंजा दरम्यान हॉटेल्स, ढाबा व पत्र्यांच्या शेडमध्ये अवैधरित्या सुरु बायोडिझेल पंप थाटण्यात आले आहेत. याठिकाणी हजार ते पाच हजार लिटर क्षमतेच्या साध्या टाक्यांमध्ये बोगस बायोडिझेल साठवण्यात येत आहेत. या टाक्यांना रिडींग मीटर लावण्यात आले असून इलेक्ट्रीक मोटरद्वारे या टाक्यांमधील बोगस बायोडिझेल वाहनांमध्ये टाकले जात आहेत. बाजारभावापेक्षा २५ ते ३० रुपये कमी दरात बायोडिझेल मिळत असल्यामुळे या पंपमधून मोठया प्रमाणावर बायोडिझेलची विक्री होत आहे.

परंतू या टाक्यांमध्ये बायोडिझेल आहे की अन्य कुठले घातक रसायन याबाबत कुठलीही शाश्‍वती नाही. सदर बोगस बायोडिझेलमुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे. मात्र, याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि.२३ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेवून कोठडा शिवारात असलेल्या श्रीश्री बायोडिझेल पंपावर कारवाई करण्यात आली असून सदर पंप सिल करण्यात आला आहे.

महामार्ग असल्याने तेथून हजारो ट्रक मार्गस्थ होत असतात. त्यातच बाजार भावापेक्षा सुमारे ३० रुपये कमी दराने डिझेल विक्री करण्यात येते. त्यामुळे श्रीश्री बायोडिझेल पंपवर चोवीस तास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, या बायोडिझेल चालकाकडे बायोडिझेल विक्रीचा कोणताही परवाना नाही. तरीही अनधिकृतपणे हा पंप सुरु आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी याच बायोडिझेलवर कारवाई करुन ते सिल करण्यात आले होते.

परंतू मालकाने पुन्हा दुसर्‍याच दिवशी सिल तोडून बायोडिझेल विक्री सुरु केली होती. त्यामुळे संबंधीत पंपचालकावर महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला दिसत नाही किंवा महसूल, पोलीस विभागाशी संबंधीत मालकाचे साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, काल दि. २५ रोजी रात्री ८ च्या सुमारास कोठडा शिवारातील अनधिकृत श्रीश्री बायोडिझेल पंप महसूल व पोलीस विभागाने सिल केला आहे.

तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, अक्षय लोहारकर, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, प्रविण कोळी व पोलिस कर्मचारी यांनी ही कारवाई केली. तसेच पंपचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री धोरणानुसार वाहनांना थेट बायोडिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु बायोडिझेल पंपावर वाहनात बायोडिझेल विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक साठवणूकदार व पुरवठादार व विक्रेता ज्या ठिकाणी बायोडिझेलची विक्री करावयाची आहे तेथे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असतांना ते लावलेले नाही. वाहनामध्ये वापरात येणार्‍या हायस्पीड डिझेलसोबत मिश्रण करावयाच्या बायोडिझेलचे प्रमाण (टक्केवारी) दर्शविणारा फलक साठवणूक व विक्री केंद्रावर दर्शनी भागावर लावलेला नाही. निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात बायोडिझेलचा वापर वाहनाच्या इंजिनाकरीता नुकसानकारक असल्याने सूचना देणारा फलक दर्शनी भागावर लावलेला नाही.

श्रेणी बी पेट्रोलियम पदार्थाकरीता लागू असलेले सुरक्षित अंतरासंबंधिचे सर्व निकष बायोडिझेल केंद्रांना लागू असतांना त्याचे पालन केलेले नाही. त्यामुळे सर्व नियमांचा भंग केल्याने बायोडिझेल पंप सिल करण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले आहे. तसेच बायोडिझेल पुरवठ्याच्या तपशिलासह आणि मान्यता प्राप्त प्रयोग शाळेच्या चाचणी अहवालासह बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि विक्री यांचा अभिलेख पाच दिवसाच्या आत कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, श्रीश्री बायोडिझेल हा पंप दुसर्‍यादा सिल करण्यात आला आहे. यापुर्वी तहसिलदार सुनिता जर्‍हाड यांच्या कार्यकाळात सदर पंप सिल करण्यात आले होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com