शेकडो लोकांचे जीव वाचणार असतील तर हा गुन्हा पुन्हा पुन्हा करणार

माजी आ.शिरीष चौधरी यांचे ना.नवाब मलिकांना प्रत्युत्तर
शेकडो लोकांचे जीव वाचणार असतील तर हा गुन्हा पुन्हा पुन्हा करणार

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

आमच्या हिरा उद्योग समुहाकडे एक्पोर्टचा परवाना आहे. आम्ही स्वखर्चाने गोरगरीबांना रेमडिसिवीर इंजेक्शनचे वाटप केले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री ना.नवाब मलिकांना हा गुन्हा वाटत असेल तर हा गुन्हा मी केला असून यापुढेही जनतेसाठी सेवेसाठी पुन्हा पुन्हा करेल, असे प्रत्युत्तर माजी आ.शिरीष चौधरी यांनी दिले.

दरम्यान, आम्हाला सरकारने आजही परवानगी दिली तरी काही तासातच एक लाखांवर इंजेक्शन आम्ही उपलब्ध करु शकतो, असेही श्री.चौधरी यांनी स्पष्ट केले.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून नंदुरबार येथील हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्हमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा असून त्याचा काळाबाजार करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

या आरोपाचे खंडण करण्यासाठी अमळनेरचे माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. श्री.चौधरी म्हणाले, खान्देशात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. रेमडिसिवीर इंजेक्शनअभावी शेकडो रुग्णांचे प्राण गेले.

अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. काल परवा माझ्यासमोर २७ मृतदेह जळत होते. अनेक मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी वाट पहावी लागत आहे. ही बिकट स्थिती अनेक कारणांनी असली तरी रेमडिसिवीर इंजेक्शनअभावी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आम्ही हे इंजेक्शन लोकांना पुरविण्याचे ठरविले.

आमच्या हिरागृपकडे एक्स्पोर्टचा परवाना आहे. त्या आधारे आम्ही सरळ कंपन्यांकडून रेमडिसिवीर इंजेक्शन मागवले होते. सुमारे साडे सात हजार रुग्णांना आम्ही हे इंजेक्शन वाटले आहे. मात्र, ज्यांनाही हे इंजेक्शन दिले आहे, त्या रुग्णांचे सिटी स्कॅन रिपोर्ट, कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट, आधार कार्ड आणि एमडी डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रीप्शन एवढया कागदपत्रांची पडताळणी करुनच वाटप केले आहे.

त्यामुळे यात कुठलाही काळाबाजार झालेला नाही. आमच्याकडे कोणताही साठा नाही. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी इंजेक्शनचे रितसर वाटप केले आहे. अजूनही राज्यात लाखो लोकांना या इंजेक्शनची गरज आहे.

यासाठी आम्ही निर्यातबंदी असलेल्या इंजेक्शनचे वितरण करण्यास परवानगी द्यावी, सरकार सांगेल त्याठिकाणी आम्ही त्याचे वाटप करु, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही याबाबत राज्य सरकारला माहिती दिली.

मला शासनातील मंत्री, आमदार, खासदार यांचे इंजेक्शनसाठी फोन येत आहेत.हे काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे आ.अनिल पाटील यांनी मलिकांकडे ही तक्रार केल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी विरोध करावा मात्र कोणत्या मुद्दयावरुन आणि केव्हा करावा याचीही अक्कल पाहिजे. लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नावर विनाकारण राजकारण करु नये, असेही श्री.चौधरी यांनी सांगितले.

मात्र तरीही मंत्री नवाब मलिक यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन आमच्याकडे इंजेक्शनचा साठा असल्याची चुकीची माहिती दिली. आमच्याकडे कुठलाही साठा नाही. आम्ही रितसर गोरगरीबांना गरजूंना इंजेक्शन वाटप केले आहेत.

जर याला मंत्री नवाब मलिक काळाबाजार आणि गुन्हा म्हणत असतील तर हा गुन्हा आम्ही केला आहे आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा पुन्हा हा गुन्हा करत राहू, असे आव्हान श्री.चौधरी यांनी दिले आहे. एवढेच काय तर सरकारने परवानगी दिली तर अवघ्या काही तासातच एक लाखांवर इंजेक्शन उपलब्ध करुन देवू, असही श्री.चौधरी यांनी स्पष्ट केले.

श्री.चौधरी म्हणाले, मलिक यांनी एकदा नंदुरबारला येवून येथील करोनाची बिकट परिस्थिती पहावी म्हणजे त्यांना या परिस्थितीची जाणीव होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com