अन् पाच दाम्पत्यांचा पुन्हा फुलला संसार

९० प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा, चोरीला गेलेला माल संबंधीतांना सुपूर्द, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम
 अन् पाच दाम्पत्यांचा पुन्हा फुलला संसार

नंदुरबार | दि.९| प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे (Police force) भरविण्यात आलेल्या जनता दरबारात (Janata Darbar) आज एकाच दिवसात तब्बत १०६ तक्रारी मांडण्यात आल्या होत्या त्यापैकी ९० तक्रारींचे जागेवरच निवारण (Prevention) करण्यात आले. उर्वरित तक्रारींची अधिक चौकशी (Inquiry into complaints) करुन लवकरच त्यावरही तोडगा काढण्यात येणार आहे.

सामान्य नागरीकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे तसेच सामान्य जनतेच्या मनातील पोलीसांविषयी भिती दूर होऊन पोलीस व जनता संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी आज दि.२४ मे २०२२ रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

जनता दरबाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे, विधी सेवा प्राधिकारणकडील विधीज्ञ ऍड.रोहन गिरासे,

ऍड. श्रीमती सिमा खत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस विभागातील व महसुल विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबाराचे कौतूक केले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. सामान्य माणुस आज देखील प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांसमोर येऊन मोकळेपणाने समस्या मांडण्यास घाबरतो.

प्रशासनातील अधिकार्‍यांबाबतची सामान्य जनतेच्या मनातील भिती ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी प्रशासनाला देखील जनतेच्या समस्या सोडविणे सोईचे जाईल. नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांनी कसलीही भिती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून त्यांच्या कौटुंबीक, शेतजमीनी विषयी, गुन्ह्यांशी संबंधीत व इतर समस्या/तक्रारी मांडत होते.

परंतु कार्यालयात बसून त्यांना तक्रारींचे निरसन करता येत नव्हते. या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच सत्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी आजचा पोलीस व जनता दरबार आयोजीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबारासाठी नंदुरबार तालुका पोलीस हद्दीतील सुमारे ३०० पुरुष व स्त्रीया उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या समस्या / तक्रारी स्वत: पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले.

पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या ५ दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी पाचही दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आत्माराम शंकर मराठे (वय-८०) यांचे काही दिवसांपूर्वी मुलगा व सुनेसोबत कौटुंबीक कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा व सुन यांना समज देऊन त्यांच्यातील वाद हा जनता दरबारामध्ये सोडविण्यात आला.

जनता दरबारामध्ये मोबाईल हरविल्याबाबत बर्‍याचशा तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी नंदुरबार पोलीसांनी १२ तक्रारदारांचे हरविलेले मोबाईल मुळ तक्रारदारांना जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या हस्ते परत करण्यात आले.

श्रीमती मीनाबाई श्रीराम पाटील रा.होळतर्फे रनाळा यांचे मयत पती नामे श्रीराम साहेबराव पाटील यांनी भावांसोबत झालेल्या शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून आत्महत्या केली होती. त्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत मयताचे भावांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

पतीच्या आत्महत्येनंतर देखील त्यांच्या भावांनी मीनाबाई पाटील यांना शेत जमीनीचा हिस्सा न देता धमक्या दिल्या होत्या. त्याबाबतचा अर्ज जनता दरबारात प्राप्त झाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांचे समक्ष मयताच्या भावांनी शेतीचा हिस्सा देण्याचे मान्य केले. त्यामुळे श्रीमती मीनाबाई श्रीराम पाटील यांचा फार दिवसांपासून प्रलंबीत असलेला वाद जनता दरबाराच्या माध्यमातून मिटला.

सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पातील तार चोरीचे बरेचसे गुन्हे मागील काही दिवसांमध्ये घडलेले होते. ते गुन्हे नंदुरबार पोलीसांनी उघडकीस आणल्यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात नंदुरबार पोलीसांना यश आले आहे.

तसेच २ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी सुझलॉन कपंनीचे मॅनेजर सुमल यांना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते परत देण्यात आला. सुझलॉन कंपनीतील तार चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने तुकाराम सुखदेव झावरे यांनी

नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादाच्या-१३ तक्रारी, शेत जमीनीविषयी-२३ तक्रारी, हरविलेल्या मोबाईलबाबत-०४ तक्रारी, ऑनलाईन फसवणूक-०३ तक्रारी, आर्थिक फसवणूक-०७ तक्रारी, धमकी, शिवीगाळ करणे, मारहाण करणे या स्वरुपाच्या अदखलपात्र गुन्ह्यबाबत-३३ तक्रारी,

इतर विभाग (महसुल व महावितरण)-१८ तक्रारी, माहिती मिळण्याबाबत-१० तक्रारी, चारित्र्य पडताळणीचे-०४ प्रकरण, पासपोर्ट पडताळणीचे-०१ प्रकरणे असे एकुण १०६ तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९० तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलीसांना यश आले.

यातील बहुतांशी तक्रारी पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्वत: हाताळल्या. उर्वरीत १६ तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली असून त्या तक्रारींची अधिक चौकशी करून त्यावर देखील लवकरच निर्णय घेतला जाईल.

निरसन झालेल्या तक्रारींपैकी ०१ प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेनुसार, ०१ प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला तर ०१ प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याकामासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी विविध पथके तयार करुन ही सर्व प्रकरणे हाताळण्यास मदत केली.

प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. अशा प्रकारचे जनता दरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील असे यावेळी पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com