काठी येथे सर्पदंशाने विवाहित तरुणीचा मृत्यू

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांचे ठिय्या आंदोलन, गुरुवारी रास्तारोकोचा इशारा
काठी येथे सर्पदंशाने विवाहित तरुणीचा मृत्यू

मोलगी | वार्ताहर MOLAGI

वैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे काठी ता. अक्कलकुवा येथील एका 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज मोलगी ग्रामीण रुग्णालयात घडली. त्यामुळे संतप्त नातेवाईक व परिसरातील शेकडो नागरिकांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. जो पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

या संदर्भात मयत युवतीच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या घटनेनुसार, आज पावणे चार वाजेच्या सुमारास काठी ता. अक्कलकुवा येथील निलिमा कुवरसिंग वळवी ही विवाहित युवती आपल्या घरात असतांना तिला सर्पदंश झाला. त्यामुळे निलिमाने पळत जाऊन घरातील मंडळींना ही बाब सांगितली.

क्षणाचाही विलंब न करता घराजवळ उभ्या असलेल्या वाहनांतून नातेवाईकांनी निलिमा वळवी यांना मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी दवाखान्यात दाखल करुन घेतले. मात्र निलिमा यांच्यावर योग्य व पुरेसा उपचार न करता ते निघुन गेले. तेथे रुग्णाजवळ रुग्णालयातील इतर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हता.

त्यामुळे निलिमा यांची उपचाराअभावी तब्बेत जास्त बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तेव्हा नातेवाईकांनी ही बाब वैद्यकीय अधिका-यांना सांगितली असता त्यांनी नातेवाईकांना ऑक्सिजनची तसेच पुढील उपचाराला नेण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यामुळे पुढील व्यवस्था होईपर्यंत सुमारे 4.30 वाजेच्या दरम्यान निलिमा वळवी यांचा मृत्यु झाला.

निलिमा वळवी यांना वेळीच वैद्यकीय सुविधा व सेवा मिळाली नाही तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी निष्काळजीपणा केला त्यामुळेच निलिमा वळवी यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला आहे.

ग्रामीण रुग्णालयात वारंवार रुग्णांसोबत अशाच प्रकारचे वर्तन होत असल्याचा ही आरोप होत आहे. केवळ वैद्यकीय अधिकारी यांची सेवेत उदासीनता आणि निष्काळजीपणा यामुळेच निलिमा वळवी यांचा मृत्यु झाला आहे असा आरोप नागरिकांनी करत मोलगी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सुमारे 300 ते 400 काठी, मोलगी परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत निलिमा वळवी यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीतून या घटनेच्या दोषींवर कारवाई केली नाही तर सकाळी मोलगी येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्यासह मोलगीचे उपसरपंच कृष्ण वसावे उपस्थित होते.

दरम्यान, मोलगी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन आंदोलकांसोबत चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com