दलेलपूर येथील स्मशानभुमीसाठी रास्तारोको

दीड तासानंतर आंदोलन मागे
दलेलपूर येथील स्मशानभुमीसाठी रास्तारोको

मोदलपाडा,Modalpada ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा (Taloda) तालुक्यातील दलेलपूर (Dalelpur) गावातील स्मशानभूमीच्या (cemetery) प्रश्नी वारंवार तक्रार करूनदेखील प्रशासन (Administration) दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ (protest) गावकर्‍यांनी आदिवासी टायगर सेनेच्या (tribal Tiger Sena) पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी तळोदा शहराजवळील कॉलेज चौफुलीवर रास्ता रोको (Rastaroko) आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तासाच्या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तळोदा तालुक्यातील दलेलपूर गावात स्मशानभूमीसाठी शासनाने जागा दिली आहे. असे असतांना गावात स्मशानभूमी अस्तित्वात नसल्याने गावातील एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव कुठे घेऊन जावे असा प्रश्न गावकर्‍यांना पडतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी प्रशासनाला गावकरी व आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती. याउपरांतही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. गावकर्‍यांनी गुरुवारी आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कॉलेज चौफुलीजवळ रास्तारोको आंदोलन पुकारले होते. तब्बल दीड तास गावकर्‍यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडला. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. स्थानिक पोलिसांनी संबंधित भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण केल्यानंतर या अधिकार्‍यांनी दलेलपूर गावातील संबंधित जागेची मोजणी दहा दिवसांच्या आत करून देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर गावकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात टायगर सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित, तालुका उपाध्यक्ष दशरथ तडवी, शहादा तालूका अध्यक्ष संजय माळी, विनोद धानका, महेंद्र पाडवी, अनिल धानका, अमृत धानका, निलेश धानका, विनोद पाडवी आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल, युवराज चव्हाण, अनिल पाडवी, अजय कोळी, सुभाष पावरा, यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

जागा असूनही वापरता येत नाही

शासनाने स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा दिली असतांना त्या जागेचा वापर गावकर्‍यांना करता येत नाही. त्याचे कारण म्हणजे संबंधित यंत्रणेकडून जागेची मोजणी करण्यात आलेली नाही. परिणामी मयत व्यक्तीवर तेथे अंत्यसंस्कार करता येत नाही. या प्रकरणी कार्यवाही करण्यात येत नसल्याने गावकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या जागेची मोजणी संबंधित यंत्रणेने तातडीने करून दिली तर गावकर्‍यांच्या स्मशान भूमीचा मार्ग कायमचा मार्गी लागणार आहे.

Related Stories

No stories found.