नंदूरबार nandurbar । प्रतिनिधी
मोबाईलमुळे सर्व सामान्य लोकांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे. मोबाईलद्वारे बरीचशी कामे नागरिक घरी बसल्या ऑनलाईन पध्द्तीने करु शकतात. परंतु ऑनलाईन काम करीत असतांना बर्याचवेळा नागरिकांची फसवणूक (Deception of citizens) देखील होत असते. अशाच एका बोगस कॉल सेंटरचा (bogus call center) पर्दाफाश (Raid) करुन नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही (Rajmohi) गावातुन 3 आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात एका घरात गुजरात राज्यातील सुरत येथून आलेले काही तरुण राहात असून ते इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्ही.आय.पी.मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करुन ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणार्या ग्राहकांना व्ही.आय.पी. मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांचेकडून फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा इतर माध्यमातून पैसे घेवून त्यांना कोणत्याही प्रकारचेव्ही.आय.पी. मोबाईल नंबर न देता त्यांची फसवणूक करीत आहेत.
अशी बातमी मिळाल्याने पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी त्स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे माहिती घेतली असता, जावीद निजामोद्दीन मक्राणी यांच्या घरात गुजरात राज्यातील सुरत येथून दोन इसम आलेले असून त्यांच्या मदतीला गावातीलच एक इसम असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी राजमोही गावात जावीद निजामोद्दीन मक्राणी यांच्या घरी जावून त्यास आवाज देवून घराबाहेर बोलाविले. जावीद यास सुरत येथून आलेले तरुण कोठे आहेत ? असे विचारले असता, त्याने ते घराच्या छतावर त्यांचे ऑनलाईन काम करीत असल्याचे सांगितले. त्यावरून पथकाने जावीद मक्राणी यांच्या घराचे छतावर तीन तरुण खाली बसून मोबाईलवर काही तरी करतांना दिसल्याने यासीन रईस मक्राणी रा. घर नंबर-302, अल रहेमत अपार्टमेंट, कॉझवे सर्कल, रांदेर सुरत ह.मु. मोठी राजमोही ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, एजाज तमीजोद्दीन मक्राणी रा. मोठी राजमोही ता. अक्कलकुवा, यशराज विजयसिंह महिदा रा. 301-ए, भूमी कॉम्प्लेक्स, हनीपार्क रोड, सुरत यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचे 5 विविध कंपनीचे महागडे मोबाईल, सिम कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी साहित्य कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना विचारपूस केली असता, त्यांनी अतिशय धक्कादायक अशी माहिती सांगितली की, त्यांच्याकडील मोबाईलवर इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्ही.आय.पी. मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करुन ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणार्या ग्राहकांना तखझ मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून बँक अकाऊंटवरपैसे स्वीकारून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा व्ही.आय.पी. नंबर न देता ग्राहकाची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली असता यशराज महिदा हा डिप्लोमा इंजिनिअर असून यासीन हा इयत्ता 10 वी तर एजाज हा फक्त इयत्ता 9 वी पास असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांनी मागील 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांमधील नागरिकांची तखझ मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे सांगितले. सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणार्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही व तिघांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याची शक्यता असून त्यादृष्टीने देखील तपास करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक, बापु बागुल, विशाल नागरे, जितेंद्र अहिरराव, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पंकज महाले, हितेश पाटील, तुषार पाटील, दिपक न्हावी, राजेंद्र काटके, शोएब शेख पथकाने केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी ऑनलाईन शॉपींग साईटवरुन कोणत्याही अमीषाला बळी पडु नये, अनोळखी व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये किंवा पेटीएम द्वारे खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यावहार करु नये जेणे करुन आपली कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होणार नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास समक्ष जावुन संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.