पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नंदुरबार जिल्हयातील लसीकरणाचा आढावा

जिल्ह्यात लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविणार- जिल्हाधिकारी मनीषा खत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नंदुरबार जिल्हयातील लसीकरणाचा आढावा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत विविध सूचना केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील घराघरापर्यंत आता लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, आगामी काळात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पहिला डोस घेवून दुसरा डोस घेण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान राबविण्यात येईल.

तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक गावात १०० टक्के लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल, ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांची मदत घेतली जाईल. लसीकरणासाठी गावनिहाय पथके गठित करण्यात येतील.

या पथकांनी नेमून दिलेले गाव १०० टक्के लसीकरण होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय घरोघरी जावून लसीकरण केले जाईल. बाजाराच्या दिवशी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, भिती अद्याप संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच १८ वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोरोना विषाणूचा दुसरा डोस घेतलेला असेल अशाच तरुणांना,

नागरिकांना महाविद्यालय, बँक, टपाल कार्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्हयातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

तसेच ज्या नागरिकांना पहिला डोस घेवून पुरेसा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांनी तातडीने दुसरा डोस घेवून कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com