काय रस्ता, काय खड्डे, काय ते खड्ड्यात पाणी सगळं कसं ओके आहे!

तळोदेकरांनी व्हायरल केलेल्या रस्त्याच्या फोटोवरून पालिकेवर निशाणा
काय रस्ता, काय खड्डे, काय ते खड्ड्यात पाणी सगळं कसं ओके आहे!

मोदलपाडा, ता.तळोदा | वार्ताहर nandurbar

बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत नगरपालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तळोदा शहरातील मेनरोडच डांबरीकरण मागील काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. परंतू पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहन धारकांबरोबरच पादचाऱ्यानाही या रस्त्यावर चालणे मोठे कसरतीचे ठरत आहे. पालिकेने आता हा रस्ता पूर्णपणे नवीनच बनवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तळोदा पालिकेने मेनरोडपासून बसस्थानकापर्यंतचा तयार केलेला रस्ता अतिशय खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेवून नगर पालिकेने सदर रस्त्याचे डांबरीरण व खडीकरण काही दिवसापूर्वीच केले होते. तथापि पालिकेने केलेले हे काम पहिल्या पावसातच खराब झाले आहे. कारण रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अक्षरशः रस्त्यावर डबके साचले आहे. अशा डबक्यातूनच वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. त्यातही पादचाऱ्यांच्या अंगावर शिंतोडे उडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागत असते. काही टारगट मोटारसायकलस्वार अत्यंत वेगात चालवून पादचाऱ्यांवर घाण पाणी उडवतात. अशावेळी वाददेखील उद्भवत असल्याचे नागरिक सांगतात. पालिकेने सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेवून तातडीने पुन्हा दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांना मधून जोर धरू लागली आहे.

पहिल्या पावसातच रस्त्याचे तीन तेरा

काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण पालिकेने हाती घेतले होते. मात्र निकृष्ट कामामुळे त्याचे काही दिवसात तीन तेरा वाजले आहेत. सदर रस्ता पालिकेच्या खर्चातून केलेला नसून ठेकेदाराच्या सहकार्यातून केल्याचा दावा नगराध्यक्षानी सोशल मीडियावर केला होता. असे असले तरी काम दर्जेदार होणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.

खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची?

सदर रस्ता वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने येथून वाहनांची मोठी रहदारी असते. येथूनच नंदुरबारकडे जाणारी वाहनेही ये जा करतात. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकेदायक ठरला आहे. शिवाय त्याची दुरुस्ती करणे पालिकेची जबाबदारी असल्याने पालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मेनरोडवरील व्यापाऱ्यांनी घेतली नगराध्यक्षकांची भेट

तळोदा शहरातील मेनरोडवरील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांची भेट घेऊन सदर रस्ता हा पूर्णपणे खोदून नवीन सिमेंट काँक्रीटचा बनविण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी नगराध्यक्ष परदेशी यांनी देखील सर्व व्यापाऱ्यांना मेनरोडवरील रस्ता हा लवकरच दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले यावेळी संजय वाणी, गौतम जैन यांसह अनेक व्यापारी उपस्थित होते.

बाजारात जाणे नको रे बाबा

सदर रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने येथून वाहन चालवणे अतिशय जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे बाजारात वाहनावर येणे नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया वाहन चालक गणेश कलाल यांनी व्यक्त केली.

सदर रस्ता हा तळोदा शहरातील मुख्य बाजार पेठेतून जात असल्यामुळे वस्तू खरेदीकरिता नाईलाजास्तव बाजारामध्ये यावे लागत असते. परंतु रत्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने बाजारात येण्याची तर आता हिम्मतच होत नाही. तरी पालिकेने या मुख्य रस्त्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता दर्जेदार बनवावा, अशी मागणी व्यापारी निखिल सोनार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com