प्रकाशा येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

वधुवरांच्या पालकांचे पोलीसांकडून समुपदेशन, वयात आल्यावर विवाह करण्याचे आश्वासन
प्रकाशा येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी

प्रकाशा ता.शहादा येथे होणारा बालविवाह (child marriage) पोलीसांनी (Police) रोखला (stopped)असून वरवधुंच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्ष झाल्यानंतरच विवाह करण्याचे वरवधुंच्या पालकांनी सांगितले.

दि.29 एप्रिल 2023 रोजी गुजरात राज्यातील नवसारी येथील एका अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुलासोबत दि. 30एप्रिल 2023 रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली. श्री.पाटील यांनी अक्षता समितीचे सदस्या सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे यांना कळवून सदर बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले.

जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीच्या सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणार्‍या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता प्रकाशा येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. म्हणून अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबियांकडे नवसारी येथील वधू मूलीबाबत विचारपूस केली. वधू मुलगी ही उदईक विवाहाच्या वेळी प्रकाशा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीचे वय 16 वर्षे 08 महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे असलेल्या वधू मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत फोनद्वारे संपर्क करून त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले.

तसेच वधू मुलास व त्याच्या नातेवाईकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. सदर बालविवाह रोखण्यासाठी प्रकाशा येथे गेलेल्या अक्षता समितीकडून तेथील उपस्थित लोकांना व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाह विषयी जनजागृती करण्याचे काम ऑपरेशन अक्षता समितीकडून वेळोवेळी केले जात आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल असे, श्री.पाटील यांनी सांगितले.

ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात करण्यात आला असून आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारीश्रीकांत घुमरेे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय बालविवाह समितीच्या सदस्या श्रीमती नयना देवरे, पोलीस नाईक विकास कापूरे, पुरुषोत्तम सोनार, शहादा पोलीस ठाणे नेमणूकीचे पोलीस हवालदार मेहरसिंग वळवी, पोलीस अंमलदार कृष्णा जाधव यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com