नंदुरबारात उद्या पोलीस भरती परीक्षा

दोन भरारी पथकांसह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
नंदुरबारात उद्या पोलीस भरती परीक्षा
प्रवेश परीक्षा

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) उद्या दि.१४ रोजी लेखी परीक्षेचे (written examination) आयोजन (Organizing) करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ११ केंद्रांवर ४ हजार ६५१ उमेदवार परिक्षा देणार आहेत. पोलीस दलाने जय्यत तयारी केली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर (Examination Center) २ भरारी पथकांसह विशेष पथकांची करडी नजर राहणार आहे.तसेच प्रत्येक केंद्रावर व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी उद्या दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० वाजेदरम्यान पोलीस भरती लेखी परीक्षा होणार आहे.

नंदुरबार शहरातील कमला नेहरु कन्या विद्यालय, यशवंत विद्यालय, श्रॉफ हायस्कूल, डी.आर. हायस्कूल, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जी.टी.पाटील महाविद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय, एकलव्य हायस्कूल व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परिक्षेसाठी ४ हजार ६५१ उमेदवार बसणार आहेत . सदर परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यासह ४ पोलीस उप अधीक्षक , १४ पोलीस निरीक्षक, ४१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, ४२१ पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ भरारी पथकांसह विशेष पथकांची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चेकींग-फ्रिस्कींग होणार असून परीक्षेसाठी येणार्‍या उमेदवारांची बारकाईने कसून तपासणी करण्यात येणार आहे.

प्रत्येक केंद्राच्या मेनगेट व परिसरावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांसोबत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. प्रत्येक केंद्राच्या प्रत्येक खोलीनिहाय १ पोलीस अंमलदार बंदोबस्ताकामी नेमण्यात आला असून बॅगेज रुम व स्वच्छतागृह येथे देखील पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात स्ट्रॉंगरुम तयार करण्यात आली असून सदर ठिकाणी सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत.

सदर स्ट्रॉंगरुममधून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षा सुरु होण्यापूर्वी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी दुसर्‍या सशस्त्र अंमलदारांसोबत आपल्या केंद्रांवर घेऊन जातील व परीक्षा संपल्यानंतर सदर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आपल्या केंद्रावरुन स्ट्रॉगरुमपर्यंत घेऊन येतील. सदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर व्हिडीओ शुटींग करण्यात येणार असून बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com