
शहादा | ता. प्र. - SHAHADA
तालुक्यातील पाडळदा (Padalde) येथे आढळलेल्या ऐतिहासिक तोफांच्या पार्श्वभुमीवर अरुण हरी पाटील यांच्या घराचे बांधकाम व खोदकाम (stop construction) त्वरीत थांबवण्यात यावे तसेच तोफांचे स्थलांतर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवास करण्यात येवू नये, असे आदेश पुरातत्व विभागाच्या (Archeology Department) सहाय्यक संचालक सौ.आरती आळे यांनी शहादा तहसिलदारांना दिले आहेत. तहसिलदारांना दिलेल्या पत्रात दैनिक देशदूत वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे.
तालुक्यातील पाडळदे येथील अरुण हरी पाटील यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू होते. खोदकाम सुरु असतांना तेथे एका पाठोपाठ दहा लहान मोठ्या वस्तू पंचधातुच्या तोफा आढळून आल्या.
यातील एक तोफ पितळी आहे. या तोफा काही पाच फुटाच्या तर काही चार फुटाच्या आहेत. त्यामुळे या तोफा ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे. तोफा या नेमक्या किती पुरातन आहेत, कोणाच्या काळातील आहे, त्यांची ऐतिहासिक महिती पुरातत्व विभागाचे पथक आल्यानंतरच समजू शकणार आहे.
दरम्यान, याबाबत दैनिक देशदूतमध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक सौ.आरती आळे यांनी देशदूतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत शहादा तहसिलदारांना पत्र दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे, मौजे पाडळदा येथे खोदकामात पंचधातूच्या तोफा आढळून आल्याचे वृत्त दैनिक देशदूतमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अरुण पाटील यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी सुरु असलेल्या खोदकामात लोखंडाच्या जड व लांब वस्तू आढळून आल्या आहेत.
त्या बाहेर काढल्यानंतर त्यात एकुण १० तोफा मिळाल्याबाबतचे वृत्त देशदूतमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, पाडळदे येथील अरुण पाटील यांच्या घराचे बांधकाम व खोदकाम त्वरीत थांबविण्यात यावे.
तसेच याठिकाणी मिळालेल्या तोफांचे स्थलांतर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय करण्यात येवू नये. तोफा मिळालेल्या ठिकाणची तसेच तोफांची पाहणी केल्यानंतरच सदर बांधकाम करावे किंवा कसे याबाबत सुचना दिल्यानंतरच काम सुरु करण्यात यावे, असेही सौ.आळे यांनी पत्रात म्हटले आहे.