ऑपरेशन मुस्कान : 241 बालके पालकांच्या स्वाधीन

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई
ऑपरेशन मुस्कान : 241 बालके पालकांच्या स्वाधीन

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या 20 दिवसात अपह्रत 3, हरविलेल्या व्यक्ती 25 तसेच बालकामगार म्हणुन काम करीत असलेल्या,भिक्षा मागणार्‍या, भंगार गोळा करणार्‍या अशा पालकांकडून दुर्लक्षीत झालेल्या एकूण 241 मुल,मुली शोधुन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 पासुन ऑपरेशन मुस्कान ही मोहीम दरवर्षी 1 ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत अपहृत अल्पवयीन मुले, मुली तसेच बेवारस, भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचीत असणार्‍या अल्पवयीन मुल-मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षण गृहे यांच्याकडेस सुपूर्त करण्यात येत असते.

त्यानुसार आतापावेओ एकूण 8 मोहीमा राबवून हजारो बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्ण्याचा प्रयत्न राज्यासह नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केला आहे.

ऑपरेशन मुस्कानची 9 वी मोहिम या वर्षी दि.1 ते 31 डिसेबर या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातून 1 अधिकारी व 4 अंमलदारांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हयातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणार्‍या अशासकीय संस्था व बाल पोलीस पथकातील अधिकारी,अंमलदार यांचादेखील सदर मोहीमेत सहभाग आहे.

वरील सर्व घटकांची जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेवून ऑपरेशन मुस्कान प्रभावीपणे राबविण्यासाठी रुपरेषा ठरविण्यात आली.

त्याअन्वये संपुर्ण मोहिमेदरम्यान जिल्हयातील वेगवेगळे रेल्वेस्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी काम करणारे बालके, भिक मागणारी, कचरा गोळा करणारी बालके यांचा शोध घेतला जात आहे.

यात आतापावेतो वरील संपुर्ण कारवाईमध्ये अपह्रत 3, हरविलेल्या व्यक्ती 25 तसेच बालकामगार म्हणुन काम करीत असलेल्या/भिक्षा मागणार्‍या, भंगार गोळा करणार्‍या अशा पालकांकडून दुर्लक्षीत झालेल्या, एकूण 241 मुला/मुली शोधुन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

ऑपरेशन मुस्कान-9 ही मोहिम मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थागुअशा विजयसिंह राजपुत, यांच्या समन्वयात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी , तेथील विशेष पथकातील अधिकारी अंमलदार यांचे सहभागातुन राबविण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com