ऑपरेशन मुस्कान : जिल्हयातील 198 बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश

ऑपरेशन मुस्कान : जिल्हयातील 198 बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) मोहिमेंतर्गत एक महिन्यात जिल्हयातील 198 बालकांना (locating 198 children) शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला (Nandurbar District Police Force) यश (succeeds) आले आहे. या बालकांच्या पालकांचे समुपदेशन (Parental counseling) करुन त्यांना शिक्षण व बालहक्काची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 पासून ऑपरेशन मुस्कान ही मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत अपहृत अल्पवयीन मुले, मुली तसेच बेवारस, भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणार्‍या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षण गृहे यांच्याकडेस सुपूर्द करण्यात येते. त्यानुसार यावर्षीदेखील दि.1 ते 30 जून 2022 या दरम्यान महाराष्ट्र राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 11 राबविण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान-11 राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना देऊन मार्गदर्शन केले. सदर ऑपरेशन मुस्कान-11 साठी जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हयातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणार्‍या अशासकीय संस्था व बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी भाग घेतला.

प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनचे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस अंमलदार यांची पथकात नेमणूक केली. वरील सर्व घटकातील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेवून ऑपरेशन मुस्कान 11 प्रभावीपणे राबविण्यासाठी रुपरेषा ठरविण्यात आली.

संपुर्ण मोहिमेदरम्यान जिल्हयातील वेगवेगळे रेल्वेस्टेशन, बसस्थानके, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी काम करणारे बालके, भिक मागणारी बालके तसेच कचरा गोळा करणारी बालके यांचा शोध घेतला.

सदर मोहिमेदरम्यान नंदुरबार शहर पोलीस स्टेशन-14 बालके व 5 बालिका, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन 11 बालके व 1 बालिका, उपनगर पोलीस स्टेशन-12 बालके व 5 बालिका, विसरवाडी पोलीस स्टेशन 12 बालके व 3 बालिका, नवापूर पोलीस स्टेशन 14 बालके व 4 बालिका, शहादा पोलीस स्टेशन-3 बालके व 3 बालिका, सारंगखेडा पोलीस स्टेशन 12 बालके व 11 बालिका, म्हसावद पोलीस स्टेशन- 20 बालके व 5 बालिका, धडगाव पोलीस स्टेशन 10 बालके व 1 बालिका, तळोदा पोलीस स्टेशन-09 बालके व 1 बालिका, अक्कलकुवा पोलीस स्टेशन 14 बालके व 3 बालिका व मोलगी पोलीस स्टेशन-5 बालके व 1 बालिका असे एकूण 141 बालके व 43 बालिका यांचा शोध संपूर्ण मोहिमेदरम्यान घेऊन त्यांच्या समक्ष पालकांना बोलावुन त्यांचे समुपदेशन करून शिक्षणाची व बालहक्कांची माहिती दिली. तसेच त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात जिल्हा पोलीस दलास यश आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे असई भगवान धात्रक यांच्या नेतृत्वात नेमलेल्या विशेष पथकाने जिल्हयातील सर्व शहरांना भेटी देवून एकुण 14 अल्पवयीन बालकांना शोधून व त्यांना त्यांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना व संबंधित हॉटेल चालकांना योग्य ती कायद्याची समज दिली. तसेच पालक नसलेल्या बालकांना बालसंरक्षण गृहात पाठविण्याची दक्षता घेऊन मोलाची कामगिरी बजावली.

मोहिमे दरम्यान एकुण 198 अल्पवयीन बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले. सदर मोहिम पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे सर्व प्रभारी अधिकारी, त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व असई भगवान धात्रक व अंमलदार यांनी यशस्वीपणे राबविली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com