
नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
नंदुरबार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (Caste Certificate Verification Committee) मार्फत आजपावेतो एकूण ५ हजार ९५९ जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्ग (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. परंतु विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत.
त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. सर्व विद्यार्थ्यांना व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन फॉर्म भरुन नोडल अधिकारी मार्फत तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावे. वेळेत अर्ज न भरल्यास महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल.
आजपावेतो या समितीकडून ऑनलाईन वैधता प्रमाणपत्र एकूण ५ हजार ९५९ वितरीत करण्यात आली आहेत. उपरोक्त प्रवर्गातील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित वेळेत ऑनलाईन भरुन त्याची एक साक्षांकित प्रत पुरावे जोडून (ऑफलाईन पध्दतीने दि.२९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.
ऑनलाईन फॉर्म भरतांना अर्जदाराने स्वतःचा किंवा पालकांचा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर नमूद करावा. वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन ई-मेलवर पाठविण्यात येते. तसेच त्रूटी असेल तर तेही ई-मेलवर पाठविण्यात येते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत समिती कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन फॉर्म भरतांना मुळ कागदपत्रे अपलोड करावी. तसेच ऑनलाईन फॉर्मची हार्ड कॉपी व कागदपत्रे राजपत्रित अधिकार्यांची सहीने साक्षांकित करुन कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव प्राची वाजे यांनी केले आहे.