Video ‘हर घर तिरंगा’ : नवापूरमधून निघाली एक हजार एकशे सात फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

Video ‘हर घर तिरंगा’ : नवापूरमधून निघाली एक हजार एकशे सात फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

नवापूर - प्रेमेंद्र पाटील Navapur

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नवापूर (navapur) शहरात जिल्हा पोलीस दल नंदुरबार (District Police Force Nandurbar), नवापूर तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्था यांच्या वतीने आज शहरातून एक हजार एकशे सात फूट लांब व १० फुट रुंद असलेल्या भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व स्तरातील नागरिकांच्या सहभागाने शहरात एक ऐतिहासिक व अभूतपूर्व असे देशभक्तीने भारावलेले वातावरण निर्माण झाले होते. शहरातील मुख्य मार्गांवरून मिरविण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीवर ठिकठिकाणी नागरिक महिला, पुरूषांनी पुष्पवृष्टी व स्वागत करून अपार उत्साह व देशभक्तीची प्रचिती दिली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी शहरातून एक हजार एकशे सात फूट लांब व १० फुट रुंद असलेली तिरंगा यात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. तिरंगा यात्रेत दोन हजाराच्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

सामुहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर शहरातील वरिष्ठ महाविद्यालाया पासून जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील (District Superintendent of Police P. R. Patil) यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून भव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करणवाल, नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. तिरंगा यात्रेत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटना, व्यापारी, महिला मंडळ आणी सर्वसामान्य आबालवृद्ध महिला, पुरूष नागरिक यांनी अपार उत्साहाने सहभागी होऊन "आजादी का अमृत महोत्सव", निमित्त ऐतिहासिक तिरंगा यात्रेचे साक्षीदार होऊन अपार देशभक्तीची प्रचिती देत तिरंगा यात्रा ऐतिहासिक व अभूतपूर्व यशस्वी केली.

आमदार शिरीष नाईक यांनीही तिरंगा यात्रेत उपस्थित राहून आयोजक व नागरिकांचा उत्साह वाढविला. नवापूरचे सुपुत्र तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण गुजरात (gujrat) विभागाचे प्रभारी प्रचारक स्वयंसेवक राहुल टिभे यांनी हा १ हजार १०७ फुट लांब आणी १० फुट रुंद तिरंगा उपलब्ध करून दिला. तिरंगा यात्रा वेळेस जिल्हा परिषद सदस्या संगीता भरत गावीत, मीराबेन चोखावाला, शितलबेन वाणी, डॉ.तेजल चोखावाला, मृदुला भांडारकर,आरती चौधरी,नगरसेवक, नगरसेविका, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, तालुका गटविकास अधिकारी सी के माळी, महिला बालकल्याण अधिकारी संजय कोंडार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, अशोक मोकळ मनोज पाटील विसरवाडी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले सूत्रसंचालन भटू जाधव तर आभार तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मानले. सामूहिक राष्ट्रगीताने यात्रेच्या समारोप झाला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com