
नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :
जिल्ह्यासाठी 16 नव्या रुग्णवाहिका घेण्यात आल्या असून आणखी 8 रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. तसेच 12 दूचाकी रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होणार आहेत.
नर्मदा किनार्यावरील 64 गावांना पावसाळ्यातील चार महिन्याचे अन्नधान्य देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय गाभा समिती आणि नवसंजीवनी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, बी.एफ.राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, कांतीलाल टाटीया, लतिका राजपूत आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यासाठी 16 नव्या रुग्णवाहिका घेण्यात आल्या असून आणखी 8 रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. तसेच 12 दूचाकी रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होणार आहेत. या रुग्णवाहिकांचा उपयोग करून गर्भवती मातेला वेळेवर उपचार मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे.
अमृत आहार योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या निधीचे वितरण करण्यात यावे. अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी मार्च अखेरपर्यंत भरती प्रक्रीया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.बैठकीस समितीचे सदस्य, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि बालविकास अधिकारी उपस्थित होते.
नर्मदा किनार्यावरील 64 गावांना पावसाळ्यातील चार महिन्याचे अन्नधान्य देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुलीच्या शिक्षणाविषयी जनजागृतीवर भर द्या
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले. मुलीच्या शिक्षणाविषयी जनजागृतीवर भर देण्यात यावा. दि.8 मार्च रोजी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
मुलींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्यावी, महिन्यातील दोन दिवस गावातील अंगणवाडीत बालकांचे वजन व उंची मोजण्याचे आणि त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या मुलींच्या सत्कारासारखे उपक्रम राबविण्याची सूचना त्यांनी केली.