जिल्हयात 97 मुलांनी गमावले एक पालक

दोन्ही पालक गमावलेला एकही बालक नाही
जिल्हयात 97 मुलांनी गमावले एक पालक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

कोविडमुळे 0 ते 18 वयोगटातील 97 मुलांनी आपले एक पालक गमावले आहे. दरम्यान, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नंदुरबार जिल्हयात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 66 असल्याचे सांगीतले होते. मात्र, दोन्ही पालक गमावलेल्या एकही बालकाची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

राज्यात करोनामुळे 195 बालके अनाथ झाले असून त्यातील सर्वाधिक 93 बालके नंदुरबार जिल्हयातील असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

या 93 पैकी 66 मुलांनी दोन्ही पालक तर 27 मुलांनी एक पालक गमावल्याचेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले होते.

याबाबत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी उमेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जिल्हयात 0 ते 18 वयोगटातील 97 बालकांनी आपला एक पालक गमावला असून दोन्ही पालक गमावलेल्या एकाही बालकाची माहिती अद्याप प्रशासनाकडे नसल्याचे सांगीतले.

तसेच जिल्हयात आतापर्यंत 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात किती मुलांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत, याची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड-19 संकटकाळात पालक मृत्यूमुखी पडलेल्या आणि दोन्ही पालक रुग्णालयांमध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नसलेल्या बालकांच्या मदतीसाठी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या बालकांना कृती दलाच्या माध्यमातून संपूर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कोवीड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे संकटात सापडलेली बालकांची माहिती महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार यांच्या वतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनिस व पोलीस पाटलांच्या माध्यमातून संकलित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या एकही बालकांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. जिल्ह्यातील नागरीकांनी 0 ते 18 वर्ष व 18 ते 30 वर्ष वयोगटातील बालके व तरुण/तरुणी जिल्ह्यात आढळून आल्यास अथवा नागरिकांना अशी माहिती मिळाल्यास महिला व बाल विकास विभाग हेल्पलाईन क्रमांक 8308992222, 7400015518, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार कंट्रोल रुम 02564-210345, 210234, बाल कल्याण समिती 9307143016, 9421199281, 9422748491, जिल्हा बाल संरक्षण कक्ष नंदुरबार 9421477143 व चाईल्ड लाईन क्रमांक 1098 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com