तळोदा येथे 25 बेडचे कोविड सेंटर सुरू होणार

आ. राजेश पाडवी यांची पत्रकार परिषदेत माहिती
तळोदा येथे 25 बेडचे कोविड सेंटर सुरू होणार

मोदलपाडा/सोमावल, ता.तळोदा - Taloda - प्रतिनिधी :

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरात करोना रुग्णांसाठी लोकसभागातून 25 ऑक्सिजन युक्त बेडचे कोविड सेंटर बुधवारपासून सुरू करणार असल्याची माहिती आ. राजेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कोविड सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हे कोविड सेंटर जिल्हा प्रशासन, तळोदा नगरपालिका, आ.राजेश पाडवी मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे.

सध्या करोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अश्या रुग्णांची दिवसागणिक मोठी संख्या वाढत आहे. त्याचबरोबर गंभिर रुग्णही वाढत आहेत. त्यांना शासकीय अथवा खाजगी दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन आ.राजेश पाडवी यांनी लोकसहभाग व सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून तळोदा शहरातील पशुचिकित्सालयात 25 ऑक्सिजन युक्त बेडची कोविड सेंटर बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

त्याच दिवशी आ.राजेश पाडवी यांचा वाढदिवसदेखील आहे. त्याचे औचित्य साधत हे कोविड सेंटर उभारणार असल्याचे आ.पाडवी यांनी सांगितले.

या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय नंदुरबार शहादा-तळोदा येथील एम डी व एम बी बी एस डॉक्टर रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध राहणार आहेत.

त्याचबरोबर या रुग्णांना तळोदा शहरातील सर्व मेडिकल मोफत औषधी देणार आहेत. रुग्णांना कोविडसाठी आवश्यक असलेला सकस आहार दिला जाणार असल्याचेही आ. पाडवी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनदेखील आवश्यक त्या वैद्यकीय सेवा कोविड सेंटरला पुरविणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रा.विलास डामरे, विरसिंग पाडवी, जगदीश परदेशी, गुड्डू वळवी, उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमार्फत करोना रुग्णांचे समुपदेशन करणार

कोरोना रुग्णांमध्ये महामारीबाबत प्रचंड दहशत आहे. साहजिकच रुग्णदेखील तपासणीसाठी पुढे येत नाहीत. अश्या रुग्णांसाठी कार्यकर्त्यांमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांना घरीच मोफत औषध पुरविण्यात येतील.

तळोदा तालुक्यासाठी चार व शहादा तालुक्यासाठी चार कार्यकर्त्यांची नियुक्ती करणार असून वेळेवेळी त्यांच्याशी संवाद साधून प्रकृतीची दखल घेण्यात येणार आहे.दरम्यान, मतदार संघासाठीदेखील कोरोना रुग्णांना दवाखान्यातुन नेआण करण्याकरिता चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे आ. पाडवी यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी मोफत

या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येणार असून नाश्ता चहा, पाणी स्वयंसेवी संस्थामार्फत देण्यात येणार आहे.

या रुग्णालयाचा फायदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णांबररोबरच शहरातील रुग्णांना होणार आहे. रुग्णालयात वैद्यकीया सोयी सुविधांपासून ते रुग्णवाहिका पर्यंत सेवा उपलब्ध असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com