नंदुरबार ; ४२ ग्रा.पं.वर भाजपा, २८ ग्रा.पं.वर शिंदे गट तर एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा दावा

नंदुरबार ; ४२ ग्रा.पं.वर भाजपा, २८ ग्रा.पं.वर शिंदे गट तर एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा दावा

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीचा (election) निकाल आज दि.१९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यात ४२ ग्रा.पं.वर भाजपा, २८ ग्रा.पं.वर शिवसेना (शिंदे गट), एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी तर चार ग्रामपंचायतीवर अपक्षांनी वर्चस्वाचा दावा केला होता. सहा ग्रामपंचायती यापुर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

त्यापैकी सुतारे, पथराई व वरूळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने तर देवपूर, नटावद व भवानीपाडा ग्रामपंचायतीवर भाजपाने यापुर्वीच दावा केला होता.

काल दि.१८ सप्टेंबर रोजी ६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. ८२.०९ टक्के मतदान झाले होते. आज दि.१९ रोजी नंदुरबार येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी करण्यात आली.

६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजपा, २५ शिवसेना (शिंदे गट), ४ अपक्ष तर १ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाने वर्चस्वाचा दावा केला आहे.

भाजपाने दावा केलेल्या ग्रामपंचायती

अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगरुळ, मालपूर, लोय, निंमगांव, कोठली, पावला, शिवपूर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपूर.

शिवसेनेने (शिंदेगट) दावा केलेल्या ग्रामपंचायती

अजेपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली.

अपक्षांचा दावा

नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील ग्रामपंचायतींवर अपक्षांनी वर्चस्वाचा दावा केला आहे.

तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

आधी ६ ग्रामपंचायतींपैकी भाजपा व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील झालेल्या ७५ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींवर भाजपा, २८ ग्रामपंचायतींवर शिवसेना (शिंदेगट), चार ग्रामपंचायतींवर अपक्ष तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

दोन भावांमध्ये लढत

नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे दोन भावांमध्ये लढत पहायला मिळाली. यात शिंदे गटाच्या शेखर पाटील यांनी बाजी मारली असून रवि पाटील व वसंत पाटील यांचा गटाचा पराभव केला.

आदिवासी विकासमंत्री यांच्या पुतणीचा पराभव

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पुतणी तथा नंदुरबार पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत यांच्या कनया प्रतिभा जयेंद्र वळवी या दुधाळे ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंचपदासाठी भाजपाकडून उभ्या होत्या. त्यांचा शिवसेनेच्या अश्‍विनी प्रकाश माळचे यांनी ५४१ मतांनी पराभव केला.

नंदपूर येथे ईश्‍वरचिठ्ठी

तालुक्यातील नंदपूर ग्रामपंचायतीत भाजपाच्या रोहिणी गुलाबसिंग नाईक व शिंदे गटाच्या सुनीता योगेश नाईक या दोघा उमेदवारांना समान १३४ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. मिकांक्षा राकेश शिंदे या बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शिंदे गटाच्या रोहिणी नाईक विजयी झाल्या. याशिवाय मंगरूळ व पातोंडा या ठिकाणी पूनर्मतमोजणी करण्यात आली.

दरम्यान, नंदुरबार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कोळदे ग्रामपंचायतीत भाजपा तर होळतर्फे हवेली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजयाचा दावा केला आहे. नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांचे गांव असलेले आष्टे गावात भाजपाचा विजय झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com