नंदुरबार व धुळे जिल्हयात मोटरसायकलींची चोरी करणारा अटकेत

12 मोटरसायकली हस्तगत
नंदुरबार व धुळे जिल्हयात मोटरसायकलींची चोरी करणारा अटकेत

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

तालुक्यातील कोळदा येथून चोरी झालेल्या मोटरसायकलींचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील 6 तसेच धुळे जिल्ह्यातील 2 मोटरसायकल अशा एकूण 12 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा येथून मोटरसायकल चोरी झाल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित करुन पोहेकॉ सजन वाघ, प्रमोद सोनवणे, पोना विकास अजगे, विजय धिवरे, किरण पावरा, सतिश घुले यांचे पथक स्थापन केले. संशयीत आरोपी हे खेतीया भागातील असल्याची खात्रीशिर माहिती काढून मार्गदर्शन करुन खेतिया येथे रवाना केले.

पथकाने खेतीया परिसरात वेशांतर करुन संशयित आरोपींचा शोध सुरु केला. मलफा ता.पानसेमल येथे सापळा रचुन संशयीत मनोज दत्तु चव्हाण रा.मलफा ता. पानसेमल यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला इसमास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने नंदुरबार तालुका हद्दीतील कोळदा येथून मोटर सायकल चोरी केल्याचे मान्य केले. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून 3, सारंगखेडा येथून 2, नंदुरबार उपनगर हद्दितून 1 तसेच धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथून व दोंडाईचा येथून प्रत्येक 1 व इतर 3 अशा एकूण 12 मोटर सायकली विधी संघर्ष बालक असलेले त्याचे 3 साथीदार यांच्यासह चोरी केल्याचे मान्य करुन सर्व मोटर सायकली काढुन दिल्या.

आरोपीकडून इतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास सुरु आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, विजयसिंह राजपूत, पोहेकॉ सजन वाघ, प्रमोद सोनवणे, पोना विकास अजगे, विजय धिवरे, किरण पावरा, सतिश घुले यांच्या पथकाने पार पाडली. अवघ्या 24 तासाच्या आत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून त्यासोबतच इतर 8 गुन्हे उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीदेखील पथकास शाबासकी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com