पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पतंगीला अधिक मागणी

पतंग व दोर्‍याच्या दरात 30 टक्के वाढ : पतंगोत्सवातून झाली लाखोंची उलाढाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पतंगीला अधिक मागणी

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पतंग बाजारालाही (kite market) फटका बसला आहे. त्यातच पतंग व दोर्‍यामध्ये दरवाढ झाल्याचे दिसुन आले.असे असले तरी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग बाजार मोठ्या प्रमावर सजला होता. मकरसंक्रातीच्या (Makar Sankrati) पूर्व संध्येला पतंग व मांजा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. पतंग व मांजा विक्रीतून लाखोंची उलाढाल झाल्याने विक्रेते काही प्रमाणात सुखावले.यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath') यांचे एकत्रीत छायाचित्र असलेली पंतगाची सर्वात अधिक मागणी आहे.

नंदुरबार जिल्हा गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला आहे. गुजरात राज्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातही गुजरात राज्याप्रमाणेच पतंगोत्सवाची धूम पहावयास मिळते. अनेक ठिकाणी सामूहिकरित्या तर काही ठिकाणी वैयक्तिकरित्या घराच्या छतांवर डीजे अथवा ध्वनिक्षेपक लावून तरुणाई नव्या गाण्यांसह जुन्या गाण्यांवरही थिरकतांना पहावयास मिळते.मकरसंक्रांतीच्या 15 ते 20 दिवस आधीपासूनच पतंगोत्सवाची तयारी सुरु असते. गुजरात राज्यातील अहमदाबाद व नडियाद येथून वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची खरेदी करुन ते नंदुरबारला विक्री केली जातात. प्लास्टीक पतंग दिसायला आकर्षक असले तरी अनेकांकडून मात्र कागदी पतंगाची मागणी सर्वाधिक केली जाते. प्लास्टीक पतंग 400 ते 500 रुपये शेकड्याप्रमाणे तर कागदी पतंग 450 ते 700 रुपये शेकडा या भावाने विक्री केली जाते.

कागदी पतंगांमध्ये पपई, साप, लंबोत्री, एक डोळा, दोन डोळा, नवरंगी अशा विविध प्रकारांना मागणी दिसून आली. तर प्लास्टीकच्या पतंगांमध्ये विविध कार्टून पतंगाला अधिक मागणी आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एकत्रीत असलेली पंतग देखील यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आकाशकंदिल असणार्‍या पतंगाला यावर्षी 30 रुपयांपर्यंत तर 70 रुपयांपर्यंत भाव होता.यंदा 30 टक्यापेक्षा अधिक दरवाढ झाली होती. 10 ते 15 रूपयांना मिळणारा पंतगांचा पंजाचा दर यंदा 30 रूपयांपर्यंत पोहचला.नंदुरबारच्या मांज्याचीही खासियत सर्वदूर आहे. मांजा खरेदीसाठीही तेवढीच गर्दी दिसून आली.

500 वार दोर्‍याला 30 ते 60 रुपये, 1000 वार दोरा 50 ते 250 रुपये, अडीच वार दोरा 150 ते 350 रुपये तर 5 हजार वार दोरा 400 ते 800 रुपयांपर्यंत भाव होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत दोर्‍याच्या दरात 30 टक्के दरवाढ झाली आहे.यंदा पतंग व मांजा विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली. मकरसंक्रातीच्या पूर्व संध्येला पतंग व मांजा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली.

नायलॉन दोर्‍याची सर्रास विक्री

दरवर्षी चायना मांजा विक्री करण्यावर बंदी आणली जात असून प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येते.इतर मांजापेक्षा चायना मांजातून अधिक फायदा होत असल्याने व चायना मांजाला अधिक मागणी असल्याने नंदुरबारच्या पतंग बाजारात काही ठिकाणी चायना मांजाची विक्री होत होती.

पतंग उडविताना काळजी घ्या - महावितरणचे आवाहन

तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. मात्र पतंग उडवताना या यंत्रणेपासून दूर राहावे. पतंगप्रेमीनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. विद्युत वाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या नजिकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा जेणेकरून तात्काळ वीजपुरवठा खंडित करून तातडीची मदत करणे सोईचे होईल. महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राच्या 1912 किंवा 1800-233-3435 किंवा 1800-102-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Stories

No stories found.