महाराजस्व अभियानात 845 जातीचे दाखले तर 700 आधारकार्ड वाटप

महाराजस्व अभियानात 845 जातीचे दाखले तर 700 आधारकार्ड वाटप

मोदलपाडा (Modalpada)ता.तळोदा वार्ताहर

शासनाच्या महाराजस्व अभियानात (Maharajaswa Abhiyan) आत्मनिर्भर योजनेअंतर्गत तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील 845 लाभार्थ्यांना जातीचे दाखल्यांचे (caste certificates) वाटप व 700 लाभार्थ्यांचे आधार कार्ड (Aadhaar cards) काढणे अथवा अपडेट करून देण्याचे काम करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यासाठी लागणारे शुल्क आदिवासी विकास विभागाचा न्यूक्लिअस बजेट योजनेतून भरण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचे महाराजस्व अभियान तीनही तालुक्यात यशस्वी होण्यास मदत झाली आहे. दरम्यान गावोगावी घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे हे शक्य झाल्याने अशी शिबिरे नियमित भरवण्याची अपेक्षा लाभार्थी कुटूंबांनी व्यक्त केली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावाने उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जातीचे प्रमाणपत्र देणे, शिधापत्रिका संबंधित कामे, आधार कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना आधार कार्ड देणे अथवा अपडेट करून देणे या प्रकारच्या कामांसाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यातील लाभार्थ्यांना तालुक्यातील त्या त्या मंडळनिहाय गावांसाठी शिबिरे ठेवून कागदपत्र गोळा करण्याचे काम करण्यात आले होते.

ही मोहीम 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन तळोदा तालुक्यातील 387 लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढणे अथवा अपडेट करून देण्यात आले तर 412 लाभार्थ्यांना जातीचा दाखला देण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यात 313 लाभार्थ्यांचे आधार कार्ड व 335 लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरीत करण्यात आले आहेत. धडगाव तालुक्यातील 98 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

महाराजस्व अभियानांतर्गत आत्मनिर्भर योजनेत तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, शहादा येथील उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, बी.व्ही.अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा, अक्कलकुवा, धडगाव येथील सेतू चालक व डीआयटी नेटवर्क इंजिनियर वाल्मीक पाटील यांनी परिश्रम घेतले. दरम्यान अभियानाअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कागदपत्रे मिळणे व अडचणी दूर करण्यासाठी अधिकार्‍यांची भेट घेता येत असल्याने जातीचे दाखले, आधार कार्ड काढून देणे अथवा अपडेट करणे व शिधा पत्रिका संबंधित कामांसाठी नियमित शिबिरे घेण्याची अपेक्षा ग्रामीण भागातील जनतेने व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com