जिल्हयातील १८ गावांमधील जनांवरांमध्ये लम्पी स्कीनचा अहवाल पॉझिटीव्ह

पाच किमीचा परिसर बाधित क्षेत्र घोषित

संगहीत चित्र
संगहीत चित्र

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले खु, शहादा तालुक्यातील मंदाणे, तितरी, गणोर, अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहीर, रामपूर, वेली, सुरगस, अक्राणी तालुक्यातील केलापाणी, रोषमाळ ब्रु,कामोद ब्रु, मोख खु, केला खु, काकरदा व उमरीगव्हाण, तसेच तळोदा तालुक्यातील तळोदा, लाखापूर फॉरेस्ट, जुवानी फॉरेस्ट येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज (Lumpy skin diseases) या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

बाधित तालुक्यातील बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन ५ किलोमीटर परिघातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित क्षेत्राच्या भोवतातील पाच किलोमीटर परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॅाक्स लसीची मात्रा देऊन १०० टक्के लसीकरण करण्यात यावे.

यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषदेने लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर करुन प्रभावी नियोजन करावे.

बाधित क्षेत्राच्या केंद्रबिंदूपासून पाच कि.मी त्रिज्येतील सर्व जनावरांचे व परसातील जनावरांचे सर्वेक्षण करावे. बाधित क्षेत्राच्या गाव व परीसरातील जनावरांचे सर्वेक्षण अहवालानुसार गठित समिती समक्ष पंचनामा करुन अहवाल तयार करावा.

निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत. गाई, म्हैस वर्गीय जनावरे एकत्र बांधत असल्यास त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात आणू नये.

बाधित गावांमध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चराईकरीता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा निरोगी भागात प्रवेश टाळावा तसेच गोठ्यास त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.

प्रादुर्भावग्रस्त भागातील जनावरांची १० किलोमीटर परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने आदीवर बंदी आणावी. बाधित परिसरात स्वच्छता ठेवून आवश्यक जैवसुरक्षेसह २ टक्के सोडियम हायपोक्लेाराईट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करावे.

रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह ८ फूट खोल खड्ड्यात पुरुन मृतदेहाच्या खाली-वर चुन्याची पावडर टाकावी. बाधित क्षेत्रात व इतर ठिकाणी आजाराबाबत पशुपालकांना विविध माध्यमाद्वारे माहिती द्यावी.

प्रादुर्भावग्रस्त गावात, संबंधित पशुवैद्यकीय प्रमुखांनी संपूर्णपणे परिसर नियंत्रणात येईपर्यंत नियमित भेटी द्याव्यात. भेट देणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांनी इतरत्र रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. जनावराच्या गोठ्यात औषधांची फवारणी करावी.

बाधित गावांमध्ये तसेच क्षेत्रभोवतालातील पाच किलोमीटर परिघातील चार महिने वयोगटावरील गोवर्गीय जनावरांना रोजग्रस्त जनावरे वगळता गोट पॉक्स लसीचे नि:शुल्क लसीकरण करण्यात यावे.तसेच रोगग्रस्त झालेल्या पशुंचा नि:शुल्क औषधोपचार करावा. असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com