तळोदा यात्रेत व्हीआयपी पासच्या माध्यमातून व्यावसायिकांची लूट

काही नगरसेवक, प्रशासनातील कर्मचार्‍यांनी मांडला उच्छाद, गोरगरीब व्यावसायिकांचे नुकसान
तळोदा यात्रेत व्हीआयपी पासच्या माध्यमातून व्यावसायिकांची लूट

मोदलपाडा Modalpada / सोमावल । वार्ताहर

तळोदा येथील कालिका माता यात्रेतील (Kalika Mata Yatra) विविध पाळण्यांवर आपल्यासह नातेवाईकांची मोफत सफर (Free trip) व्हावी यासाठी काही नगरसेवक, प्रशासनातील काही कर्मचार्‍यांनी व्हीआयपी पास (VIP pass) बनवून अक्षरशः उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. याबाबत ‘देशदूत’ ने सखोल माहिती घेतली असता या व्हीआयपी पासेसचे कांड उजेडात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून कालिका मातेची यात्रा भरवण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी कोरोनापासून थोडाफार दिलासा मिळाल्याने कालिका मातेची यात्रा ((Kalika Mata Yatra)) भरवण्यासाठी नगरपालिका, महसूल, पोलिस व वीज प्रशासनाने कंबर कसली होती. दोन वर्षांनंतर यात्रा भरत असल्यामुळे यात्रेत आपली दुकाने व पाळणे थाटणार्‍या मालकांना प्रशासनाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेत (municipality) मोफत व्हीआयपी पासची (Free VIP pass) अक्षरशः खैरात वाटण्यात आली.

त्यामुळे लांब लांबून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या झुला व पाळणा मालकांना व्हीआयपी मोफत पासचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासन यात्रेसाठी येणार्‍या व्यावसायिकांना जागा देते. त्या मोबदल्यात करदेखील (Even taxes) वसूल करण्यात येत असतो. परंतु व्हीआयपी पासचा (VIP pass) घाट कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो. यात्रेत ज्या ठिकाणी पाळणे लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी व्हीआयपी पासचा खच मोठ्या प्रमाणावर पडलेला दिसून आला. यामुळे हजारोंच्या किंमतीच्या व्हीआयपी पास बनवून देण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

यात्रेत आपले पाळणे लावण्यासाठी येणार्‍या व्यवसायिकांना जागा (Space for professionals) उपलब्ध करून देतांना पालिकेचे कर्मचारी व पदाधिकारी जणू उपकारच करीत आहोत अश्या अविर्भावात जागांचे वाटप करीत असतात. या मोबदल्यात पाळणे मालकांकडून काही नगरसेवक व काही कर्मचारी एव्हढेच नाही तर नातेवाईकांसाठी सुद्धा व्हीआयपी पासची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यात्रेत चार पैसे मिळतील या आशेने हे व्यावसायिक सुद्धा व्हीआयपी मोफत पास बनवून देतात. या पासेसवर व्हीआयपी पास असा शिक्का मारण्यात येतो. ही पास दाखवल्यावर पासधारक व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना पाळण्यात बसण्यासाठी मोफत प्रवेश मिळतो.

मात्र, नगरपालिकेचे काही पदाधिकारी व कर्मचारी व्हीआयपी (VIP pass) मोफत पास मिळवून थांबत नाहीत तर त्या पासेसच्या झेरॉक्स प्रती काढून सुद्धा आपल्या नातेवाईकांना देत असल्याचे दिसून आले आहे. परंतु झेरॉक्सऐवजी ओरिजनल व्हीआयपी पासची मागणी पाळणा चालक करत असल्याने काही वेळेस या चालकांना दमदाटीचा सुद्धा सामना करावा लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे यात्रेवर पोट भरणार्‍या या व्यावसायिकांना माणुसकीच्या आधारावर सहकार्य करणे अपेक्षित असतांना याउलट मोफत व्हीआयपी पासद्वारे (VIP pass) त्यांची लूट करण्यात येत आहे.

मोफतचा व्हीआयपी पास यात्रेतील पाळणे चालकांना व मालकांना असतोच. परंतु या व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी व वीज वितरण कंपनीचे लाईनमन व वायरमन कर्मचार्‍यांना पाळण्यात आपल्या नातेवाईकांना बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हीआयपी पासची गरज राहत नाही. त्यांचा ड्रेसकोड हाच एक व्हीआयपी पास असतो. या जोरावर ते आपल्या नातेवाईकांना सहज मोफत यात्रेची सफर घडवून आणतात. त्यामुळे व्हीआयपी पास धारकांप्रमाणेच यांचाही त्रास यात्रेतील व्यावसायिकांना सहन करावाच लागतो.

Related Stories

No stories found.