
नंदुरबार |Nandurbar
राज्यात सुरु असलेल्या सत्तानाटयाचा जिल्हयाच्या राजकारणावर कुठलाही परिणाम होणार नसला तरी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी (District Chief Amsha Padvi) यांना शिवसेनेने आमदारकीची बक्षिसी (MLA's reward) देवून नंदुरबार जिल्हयातील शिवसैनिकांना बळ (Strength to Shiv Sainiks) दिले आहे. आमदारकीच्या बळाचा वापर कारुन आ.पाडवी हे निश्चितच जिल्हयातील शिवसेनेला संजीवनी (Resuscitation) देण्याचा प्रयत्न करतील, हे निश्चित आहे. मात्र, पाडवी यांच्या आमदारकीमुळे तब्बल सात वेळा सलग अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या व सध्या आदिवासी विकास मंत्री (Minister of Tribal Development) असलेल्या ना.ऍड.के.सी.पाडवी (K.C.Padvi) यांच्यासाठी निश्तितच धोक्याची घंटा ठरु पाहणार आहे. दरम्यान, आतापर्यंत फक्त बिगर आदिवासी उमेदवाराला मिळणारी विधान परिषदेची संधी यंदा प्रथमच अतिदुर्गम भागातील सर्वसाधारण कार्यकर्त्याला देवून आदिवासी बांधवांमध्ये (Tribal brothers) समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार गेल्या अडीच वर्षापासून सत्तेत आहे. मात्र, दि.२० जून रोजी मुंबईत झालेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे भरवशाचे शिलेदार असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या तब्बल ३५ आमदारांसह सुरत गाठले. तेथून दोन दिवसांनी गुवाहाटीला पोहचले आहेत.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मागणीसाठी त्यांनी ही बंडखोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू या राजकीय सत्तानाटयाचा नंदुरबार जिल्हयाच्या राजकारणावर कुठलाही परिणाम होणाार नाही.
कारण नंदुरबार जिल्हयात आजपर्यंत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता. त्यामुळे शिवसेना केवळ विरोधक म्हणूनच आतापर्यंत सत्तासंघर्ष करतांना दिसत आहे. मात्र, अडीच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याआधीच तत्कालीन कॉंग्रेसचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश करुन कॉंग्रेसला धक्का दिला होता.
त्यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे जिल्हयातील कॉंग्रेस खिळखिळी झाली असून शिवसेनेला बळ मिळाले आहे. आतापर्यंत केवळ नगरपालिका, पंचायत समितीत बोटावर मोजण्याएवढे सदस्य वगळता इतर कुठल्याही निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळालेले नव्हते.
मात्र, चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून सात जिल्हा परिषद निवडून आल्याने चक्क जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याची मजल शिवसेनेने मारली आहे. धडगाव येथील नगरपंचायतवरदेखील शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.
याशिवाय जिल्हयातील अनेक ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटयादेखील कॉंग्रेसच्या ताब्यातून शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे निश्चितच शिवसेनची पकड जिल्हयात मजबूत होतांना दिसत आहे.
दरम्यान, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाने दखल घेवून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये त्यांना संधी दिली होती. मात्र, राज्यपालांनी या १२ आमदारांच्या नावावर हरकती घेतल्याने गेल्या दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.
नुकत्याच विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपालांच्या स्वाक्षरीची वाट न पाहता एकनाथराव खडसे यांना नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत संधी देवून आमदार बनविले आहे.
तशीच माजी आ.रघुवंशी यांनादेखील संधी मिळावी अशी अपेक्षा होती. परंतू पक्षाने आमशा पाडवी यांचे नाव जाहीर करुन जिल्हावासीयांना आश्चर्याचा धक्का दिला. नुसतीच उमेदवारी जाहीर न करता आमशा पाडवी यांना पक्षाने निवडूनही आणले आहे.
त्यामुळे आमशा पाडवी यांच्या ध्यानीमनी नसतांना त्यांना पक्षाने आमदारकीचे बक्षिस दिले आहे. सोबतच आमशा पाडवी यांच्या रुपाने जिल्हयात शिवसेनेच्या आमदाराने खाते उघडले आहे. ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे.
कारण आतापर्यंत नंदुरबार, धुळे जिल्हयाच्या इतिहासात आदिवासी उमेदवाराला प्रथमच विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे. कारण नंदुरबार जिल्हयातील चार व धुळे जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
त्यामुळे बिगर आदिवासी उमेदवाराला विधान सभेवर जाण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत विधान परिषदेवर फक्त बिगर आदिवासी उमेदवाराला विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जात होती.
मात्र, शिवसेनेने प्रथमच एका अतिदुर्गम भागातील परंतू आक्रमक असलेल्या शिवसैनिकाला विधानपरिषदेवर संधी देवून इतिहास घडविला आहे. त्यामुळे आमशा पाडवी यांच्या रुपाने पहिला आदिवासी व पहिलाच शिवसेनेचा आमदार जिल्हयातून घडला आहे.
परंतू राज्यातील सत्तानाटय हे विधान परिषद निवडणुकीच्या आधी घडले असते तर कदाचित आज चित्र वेगळे राहिले असते. आमशा पाडवी यांच्या आमदारकीमुळे जिल्हयातील शिवसेनेला अधिकच बळ मिळाले आहे. या पदाला ते निश्चितच न्याय देवून शिवसेना जिल्हाभरात वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तानाटयाचा जिल्हयातील राजकारणावर परिणाम होणार नसला तरी आमशा पाडवी यांच्या आमदारकीमुळे मात्र तब्बल सात वेळा विधान सभेवर निवडून गेलेले विद्यमान आदिवासी विकास मंत्री ना.ऍड.के.सी.पाडवी यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. आमशा पाडवी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा ७ जुलै २०२८ पर्यंत राहणार आहे.
त्यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये होणार्या विधानसभा, लोकसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हयातील चार मोठया नगरपालिका आदींच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचे एकमेव असलेले आ.आमशा पाडवी यांना आपसुकच महत्व प्राप्त होणार आहे.
आ.पाडवी हे कट्टर शिवसैनिक असून आक्रमक असल्यामुळे त्यांचा परिसरात प्रचंड दबदबा आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदी पदे त्यांनी भुषविली आहेत. सद्यस्थितीत त्यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद, नंदुरबार धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद आहे. त्याला आता आमदारकीची जोड मिळाली आहे.
दरम्यान, आ.पाडवी यांनी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली असून दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत ते केवळ २ हजार ९६ मतांनी पराभूत झाले होते.
ना.के.सी.पाडवी यांना ८२ हजार ७७० मते मिळाली होती तर आमशा पाडवी यांना ८० हजार ६७४ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाचे नागेश पाडवी यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना २१ हजार ५८३ मते मिळाली होती.
कदाचित नागेश पाडवी यांनी बंडखोरी केली नसती तर आमशा पाडवी त्याचवेळी निवडले असते. त्यावेळी त्यांना माजी आ.रघुवंशी यांचीदेखील साथ होती हे निश्चित.
मात्र, आमशा पाडवी यांना मिळालेली मते पाहता अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदार संघात त्यांना मानणारे ४०.२१ टक्के मतदार आहेत तर ना.के.सी.पाडवी यांना मानणारे ४१.२६ टक्के मतदार आहेत. त्यातच आता आमशा पाडवी यांना आमदारकीची जोड मिळाली आहे.
अजून विधानसभा निवडणुकांना अडीच वर्षांचा कालावधी आहे. या कालावधीत आ.पाडवी हे निश्चितच मतदार संघासह जिल्हाभरात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करतील. आ.पाडवी हे स्वतः उमेदवारी करणार नसले तरी धडगावचे शिवसेनेचे विजयसिंह पराडके, गणेश पराडके यांच्यासह इतर कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळू शकेल.
पराडके कुटूंबाचादेखील धडगाव तालुक्यात दबदबा आहे. धडगाव नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आहेत. दोन्ही भाऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत. गणेश पराडके हे जि.प.सभापती आहेत. त्यांचेदेखील कार्य मोठे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्यासाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.