अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री

महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष, कारवाईची मागणी
अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री
जानेवारी महिन्यात प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वतः कारवाई करत अशाप्रकारे बायोडिझेलचा पंप उध्वस्त केला होता.

खापर | वार्ताहर- KHAPAR

(Barhanpur - Ankleshwar Highway) बर्‍हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर ते पेचरीदेव दरम्यान हॉटेल्स व ढाब्यावर पुन्हा (Biodiesel) बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू झाली आहे. (police) पोलीस व महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मलिदा लाटून तेरी भी चूप और मेरी भी चूप असल्याची सद्यस्थितीत तालुक्यात असल्याने बायोडिझेलची अवैधरीत्या बिनबोभाटपणे विक्री सुरू आहे.

जानेवारी महिन्यात प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वतः कारवाई करत अशाप्रकारे बायोडिझेलचा पंप उध्वस्त केला होता.
गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

इंधन दरवाढीने सामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे ७५ रुपये प्रतिलिटर असलेल्या डिझेलने शंभरी पार केली आहे. त्यात मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई वाढली आहे.

दरवाढीमुळे अक्कलकुवा तालुक्यात डिझेलऐवजी बोगस बायोडिझेलसदृश इंधन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पेट्रोल पंपावर मिळणारे डिझेल १०४ च्या सुमारास असते तर बोगस बायोडिझेल २५ ते ३० रुपये स्वस्त असते.

त्यामुळे डिझेल विक्रीत प्रत्यक्षात घट झाल्याचा अंदाज असून बायोडिझेलसदृश इंधनाची तालुक्यात आयात व विक्री अधिक वाढली आहे. लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या येथील हॉटेल्स व ढाब्यावर थांबतात, तेथे सहजासहजी मिळणारे कमी दरातील बोगस बायोडिझेल त्यांना फायदेशीर ठरते.

दरम्यान, जानेवारी महिन्यात अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेल्समध्ये अवैधरित्या बिनबोभाटपणे बायोडिझेलची विक्री होत होती. अनेक वेळा कार्यवाही करुन देखील बायोडिझेल विक्रेते प्रशासनाला जुमानत नव्हते.

म्हणुन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अक्कलकुवा पोलिस व महसूल प्रशासनाला सोबत घेऊन खापर परिसरातील ५ हॉटेल्सवर धाडी टाकुन बायोडिझेल विक्रीबाबत खातरजमा करुन येथील हॉटेल वरील अवैध बायोडिझेलचा डेपो प्रशासनाने जे.सी.बी यंत्राद्वारे नष्ट केला होता.

काही ढाब्यावर भूमीअंतर्गत असलेल्या टाक्या काढून त्यांना ताब्यात घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अवैध बायो डिझेल विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. पोलीस व महसूल विभागाच्या सुस्त कारभारावर आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री महसूल विभागाच्या आशीर्वादानेच होत असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. याबाबत प्रांताधिकार्‍यांनी दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.