पाडळदा येथे खोदकामात आढळल्या दहा ऐतिहासिक तोफा

सर्व तोफा पंचधातूच्या, परिसरात कुतूहलाचा विषय
पाडळदा येथे खोदकामात आढळल्या दहा ऐतिहासिक तोफा

शहादा | ता. प्र. - SHAHADA

तालुक्यातील पाडळदा (Padalda) येथे अरुण हरी पाटील यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी मजूर खोदकाम (excavations) करत असतांना सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन ऐतिहासिक दहा तोफा (Historical guns) सापडल्याने परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे.

अरुण हरी पाटील यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू होते. सुरेश ठाकरे (रा.सोनवल- कवळीथ) हे मजुरांसह खोदकाम करीत असतांना लोखंडाची जड लांब वस्तू आढळून आली. ती बाहेर काढण्यात आली. पुन्हा खोदकाम सुरु केले असता एका पाठाेपाठ दहा लहान मोठ्या वस्तू निघाल्या. मजूर सुरेश ठाकरे यांनी घरमालक अरुण पाटील यांना माहिती दिली. त्यांनी त्या वस्तू बघितल्या असता ऐतिहासिक पुरातन तोफा असल्याचे निदर्शनास आले. ही वार्ता गावात पसरल्याने ग्रामस्थांनी बघण्यासाठी गर्दी केली. या तोफा काही पाच फुटाच्या तर काही चार फुटाच्या आहेत. सर्व तोफा पंचधातूच्या आहेत. त्यापैकी एक पितळी धातूची आहे. पुढचा भाग गोलाकार असून हातगोळा टाकण्यासाठी जागा आहे. मागच्या बाजूला बंदिस्त आहेत. त्यामुळे या तोफा ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे. तोफा या नेमक्या किती पुरातन आहेत, कोणाच्या काळातील आहे, त्यांची ऐतिहासिक महिती पुरातत्व विभागाचे पथक आल्यानंतरच समजू शकणार आहे.

पाडळदा ग्रामस्थांनी मात्र या ऐतिहासिक वस्तू गावाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या असल्याने जतन करण्यासाठी गावातच ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. तलाठी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन या तोफांचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती कळवली आहे. दरम्यान, शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनीदेखील भ्रमणध्वनीने घरमालक अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे.

पाडळदा गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाच्या चोहोबाजूला मोठी खंदक होती. गावात येण्या-जाण्यासाठी एकच दरवाजा होता. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील दोन मोठ्या पाय विहिरीदेखील आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याचा इतिहास या गावाला आहे. गावात स्वातंत्र्यसैनिक होते. जुन्या काळात गावाच्या संरक्षणासाठी या तोफांच्या वापर केला जात असावा असा अंदाज वर्तवण्यात येतआहे. शहादा तालुक्यात सुलतानपूर, फत्तेपूर, कोंढावळ या जुन्या ऐतिहासिक गावांमध्ये अद्यापही पुरातन वस्तू अधूनमधून आढळतअसतात.

पाडळदा गावात ऐतिहासिक परंपरा असलेली पुरातन वस्तू सापडणे म्हणजे गावाला जुना इतिहास असल्याच्या पुरावा आहे. एकप्रकारे गावाची ऐतिहासिक संपत्ती आहे. त्याची जपणूक करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त उपअभियंता शरद पाटील यांनी दिली.

सापडलेल्या जुन्या तोफांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नाही. मात्र चांगल्या स्थितीत आहेत. साधारणता दहा तोफांचे वजन सहा क्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com