कचरा मोकळा (सुटा) करणार्‍या यंत्राला मिळाले पेटंट

नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कुलच्या संशोधक मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, आदित्य पोतदार व प्रा.नितीन देवरे यांचे महत्वपूर्ण संशोधन
कचरा मोकळा (सुटा) करणार्‍या यंत्राला मिळाले पेटंट
nitin

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

येथील (Shroff High School) श्रॉफ हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा (Sushma Shah), विज्ञान शिक्षक प्रा.नितीन देवरे व माजी विद्यार्थी आदित्य पोतदार यांनी तयार केलेल्या कचरा मोकळा (सुटा) करणार्‍या (Plant) संयंत्राच्या महत्त्वपूर्ण शोधाला पेटंट मिळाले आहे. नंदुरबार (nandurbar) जिल्हयासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे.

nitin

कचर्‍याचा पुनर्वापर करून प्रदूषणासारख्या समस्यांवर मात करण्याचे उद्दिष्ट गाठले जात आहे. या पुनर्वापर प्रक्रियेत कचरा विघटन करणे अत्यंत जटील असे कार्य आहे. हे जटील कार्य करताना मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा, मनुष्यबळ वापरले जाते. '

त्याचबरोबर दुर्गंधीयुक्त हवा निर्माण होवून दुर्घटनाही घडत असतात. या समस्येवर मात करता यावी म्हणून कचरा विघटनाअगोदर त्याचे विलगीकरण करणारे संयंत्र येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान प्रेमी तज्ञांनी शोधले असून त्याचे पेटंटसुद्धा मिळविले आहे. देश पातळीवर या संयंत्राचा वापर करून मोठ्या समस्या सुटू शकणार आहेत.

वाढत्या जनसंख्येमुळे घरातून किंवा इतर मार्गाने निघणार्‍या कचर्‍याच्या मोठ्या समस्या उद्भवू पहात आहेत. म्हणूनच त्या कचर्‍याचा पुनर्वापर करण्याचे उद्योग (रिसायकल इंडस्ट्रीज) निर्माण झाले आहेत. हा कचरा पुनर्वापर उद्योगांपर्यंत पोहोचतो तेंव्हा अतिशय गुंतागुंतीच्या स्वरूपात असतो.

ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक, लोखंड किंवा इतर धातू याप्रकारात त्याचे विलगीकरण करणे खूप कठीण काम आहे. कचरा विलगीकारणाच्या कार्यपद्धतीमध्ये तो सर्वात आधी मोकळा होणे किंवा सुटा असणे आवश्यक असतो.

मात्र, सद्यस्थितीत कचरा मोकळा (सुटा) करण्यासाठी मोठमोठे रोटर वापरले जातात. पण यासाठी प्रचंड विद्युत ऊर्जेची गरज भासते किंवा मनुष्यबळाचा वापर करून हे काम केले जाते. सर्व प्रकारच्या एकत्रित व कुजलेल्या कचर्‍यामुळे प्रचंड दुर्गंधीही वाढते.

म्हणूनच अशा ठिकाणी मनुष्यबळाचा वापर कमी व्हावा. तसेच विद्युत ऊर्जेची बचत व्हावी, म्हणून या समस्येवर श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, तज्ञ विज्ञान शिक्षक प्रा.नितीन देवरे, माजी विद्यार्थी आदित्य रवींद्र पोतदार यांनी उपाय शोधला आहे.

गुंतागुंतीचा कचरा मोकळा (सुटा) करणारे संयंत्र या तज्ञांच्या टीमने शोधले आहे. त्याचे अधिकृत पेटंट मिळवले आहे. संशोधन अर्ज क्रमांक २०२२२१००३२५८ अन्वये २५ मार्च रोजी इंडियन पेटंट जर्नलमध्ये आवृत्ती क्रमांक बाराच्या पृष्ठ क्रमांक १७९८१ वर या संयंत्राचे संशोधन आकृतीसह प्रकाशित झाले आहे.

कचरा मोकळा (सुटा) करणारे यंत्र (Garbage Loosening Device) वापरण्याची कार्यपद्धती या पेटंटमध्ये संशोधनातून मांडली आहे.हे यंत्र वृत्तचिती (Cylinder) या आकाराचे आहे. यात कॅन्टिलीव्हर स्ट्रीपचा स्पायरल पद्धतीने वापर केला आहे. गुंतागुंतीचा कचरा या यंत्राच्या वरच्या बाजूस टाकला असता तो वेगवेगळ्या कॅन्टिलीव्हर स्ट्रीपवर आदळतो. यावेळी निर्माण होणार्‍या कंपनांमुळे (Vibrations) तो मोकळा (सुटा) होतो. या यंत्रासाठी विजेची गरज लागत नाही किंवा मनुष्यबळाची गरज नाही. फक्त गुंतागुंतीचा कचरा जमिनीवरून या यंत्राच्या वरच्या भागापर्यंत नेण्यासाठी कन्व्हेयर बेल्टचा वापर करावा लागतो, ज्यासाठी खूपच कमी विजेची गरज भासते.

संयंत्र संशोधक टीम प्रमुख तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा मनीष शाह यांनीघनकचर्‍याचा पुनर्वापर उद्योगांमध्ये मनुष्यबळाचा वापर कमी व्हावा. तसेच विद्युत ऊर्जेची बचत व्हावी हा उद्देश या यंत्राला बनविण्यामागे असल्याचे सांगितले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.नितीन नवलराव देवरे यांनी संशोधन टिम सदस्यया नात्याने, घनकचर्‍याच्या पुनर्वापर उद्योगांमध्ये वापरासाठी लागणारे योग्य डिझाईन बनविण्यात उपयुक्त यश आल्याचे सांगितले.

अभियांत्रिकी शिक्षण घेणारा शाळेचा माजी विद्यार्थी आदित्य रवींद्र पोतदार याने सन २०१५-१६ मध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये या संयंत्राचे उपकरण मांडले होते. रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या उपकरणाची निवड केरळ येथे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली होती.

तेथेही या उपकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधले होते. इंडियन सायन्स कॉंग्रेससाठी हे उपकरण निवडले जात सर्टिफिकेट ऑफ मेरिट देऊन सन्मान करण्यात आला होता.तसेच नवी दिल्ली येथे आयोजित सी.एस.आय.आर. इनोवेशन ऍवॉर्ड फॉर स्कूल चिल्ड्रेनसाठी मानाचे नामांकन मिळाले होते.

Related Stories

No stories found.