अकुशल कामगारांचे खोटे हजेरीपत्रक भरुन साडे आठ लाखांत फसवणूक

तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा
अकुशल कामगारांचे खोटे हजेरीपत्रक भरुन साडे आठ लाखांत फसवणूक
USER

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन ८ लाख ३३ हजार ४९६ रुपये कामगारांच्या खात्यावर वर्ग करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रनाळे भागमधील भोणे ता.जि.नंदुरबार या ग्रामपंचायतीला मनरेगा अंतर्गत भोणे शिवारातील शाना उत्तम माळी यांच्या शेतापासून हौसाबाई वेडू माळी यांच्या शेतापर्यंत खडीकरण व माती कामाचा ११०० मीटर शेत रस्ता दि.१२ मे २०२२ रोजी गटविकास अधिकारी तथा सहगट कार्यक्रम अधिकारी मनरेगा नंदुरबार यांनी मंजूर केला होता.

दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी भोणे ग्रामस्थांनी भोणे शिवारातील खडीकरण व माती कामाच्या ११०० मीटर शेतरस्त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी अर्ज दिला. त्यात म्हटले होते की, इंजिनिअर व ठेकेदार यांनी प्रशासनाची दिशाभूल करुन पाच मस्टरांची रक्कम काढून घेतले होते.

त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकार्‍यांनी सदर कामाबाबत चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. त्यात यातील नमुद आरोपीतांनी आपसात संगनमत करुन अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन अकुशल कामगार मजुरी रक्कम ८ लाख ३३ हजार ४९६ रुपये रक्कम अकुशल कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत हजेरीपत्रके नंदुरबार पंचायत समितीकडेस पाठवून शासनाची फसवणूक केली.

तसेच सदर कामकाजाची मोजमाप पुस्तिका ही वरील दोघांची गहाळ केली आहे. याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सागर रविंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तांत्रिक सहाय्यक स्वप्नील संजय सोनवणे, भोणे येथील ग्रामरोजगार सेवक समाधान चिंधा धनगर यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com