नंदुरबार जिल्हयात चार पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त

तीन तलवारी हस्तगत, सहा जणांविरुद्ध गुन्हा
नंदुरबार जिल्हयात चार पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार शहरासह शहादा व नवापूर तालुक्यातून पोलीसांनी विनापरवाना गावठी बनावटीच्या तीन पिस्तुलसह पाच जिवंत काडतुसे व चार तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांविरूध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील टापू परिसर ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर विजय काशिनाथ जाधव हा त्याच्या ताब्यात ५५ हजार रूपये किंमतीच्या दोन गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुल व १५०० रूपये किंमतीच्या तीन जिवंत काडतुस असा एकूण ५६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल बाळगतांना आढळमन आला.

याबाबत पोलीस शिपाई योगेश पवार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय काशिनाथ जाधव रा.सेंधवा (जि.बडवानी) याच्याविरूध्द भारतीय हत्यार कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि महेश माळी करीत आहेत.

नवापूर शहरातील लखानीपार्क परिसरात देवळफळी ते लहान चिंचपाडा रस्त्यालगत जगन्नाथ प्रकाश गोंडा हा त्याच्या ताब्यात २५ हजार रूपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व १० हजार रूपये किंमतीच्या दोन पिवळया धातुचे काडतुस असा एकूण २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बाळगतांना आढळून आला.

म्हणून पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात जगन्नाथ प्रकाश गोंडा (हल्ली मु. लखानीपार्क रा.कलासुतार (ओडीसा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई प्रविण कोळी करीत आहेत.

नवापूर शहरातील देवळफळी चौफुली येथे राहुल संजय गावीत हा त्याच्या ताब्यात ४०० रूपये किमतीची लोखंडी धारदार तलवार विनापरवाना त्याच्या कब्जात बाळगतांना आढळून आला. म्हणून पो.कॉ. दादाभाऊ लोटन वाघ याच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात राहुल संजय गावीत रा.चिंचपाडाफळया (ता.नवापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई प्रविण कोळी करीत आहेत.

नवापूर तालुक्यातील चितवी येथे राहणार्‍या तुकाराम शंकर गावीत याच्या घरातून १५०० रूपये किंमतीची लोखंडी तलवार पोलीसांनी जप्त केली. याप्रकरणी पोशि राजेंद्र काटके यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात तुकाराम शंकर गावीत याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. अरूण कोकणी करीत आहेत तर शहादा शहरातील शिरूड चौफुली समोरील रस्त्यावर सचिन दिलीप तांबोळी हा अवैधरित्या २५ हजार रूपये किंमतीची एक गावठी बनावटी लोखंडी पिस्तुल व ५०० रूपये किंमतीचे एक जिवंत काडतूस

असा २५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात बाळगून आढळल्याने पोशि विजय धिवरे यांच्या फिर्यादीवरून सचिन दिलीप तांबोळी रा.शिवाजीनगर (शहादा) याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय ठाकूर करीत आहेत. तर शहादा शहरातील जुनी भाजीमंडी परिसरात गोकुळ सुनिल सोनवणे हा त्याच्या ताब्यात तीन हजार रूपये किंमतीची एक लोखंडी तलवार कब्जात बाळगतांना आढळून आला.

याप्रकरणी पोलीस शिपाई भरत उगले याच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गोकुळ सुनिल सोनवणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोकॉ अशोक कोळी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com