तळवेनजिक दोन मोटरसायकलींची समारोसमोर धडक,पाच जण ठार

दोन मोटरसायकलींची समारोसमोर धडक
तळवेनजिक दोन मोटरसायकलींची समारोसमोर धडक,पाच जण ठार

बोरद/सोमावल : Nandurbar : वार्ताहर -

दोघा मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले असून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आज दुपारी तळव्यानजीक हा अपघात घडला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी उमेश शांतीलाल चव्हाण (29), पूजा उमेश चव्हाण (23), सुनंदा शांतीलाल चव्हाण (60) रा सर्व तळोदा हे मोटारसायकल (क्रमांक एम.एच.39-एल 484) ने ट्रिपल सीट बोरदहून येत होते.

त्या दरम्यान मदन दिवल्या नाईक (45), अमित मदन नाईक (12), दारासिंग छगन जांभोरे (45, रा.सर्व तुळाजा ता.तळोदा) हे मोटारसायकल (क्र.एम.एच.15 डी.टी.6340) ने तळोद्याहून बाजारहाट करून तुळाजा येथे जात होते. भरधाव वेगात असलेल्या या दोन्ही मोटारसायकलींची तळवे गावाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघाता चार जणांना डोके, हात पायांना प्रचंड मार बसला. यात उमेश चव्हाण, मदन नाईक, अमित नाईक, दारासिंग जांभोरे हे चार जण जागीच ठार झाले. तर सुनंदा शांतीलाल चव्हाण, पूजा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील सुनंदा यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना सुनंदा चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताची घटना तळवे परिसरातील नागरिकांना समजतात घटनास्थळी मोठया प्रमाणावर गर्दी झाली. अपघात एवढा भीषण होता की तेथे रक्ताचा सडा पडलेला होता.गावकर्‍यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस दाखल झाले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून सर्वांना तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारच महिन्यांपुर्वी झाला उमेशचा विवाह

दरम्यान, या अपघातातील मयत उमेश याचा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.आपल्या काकांकडे बोरद येथून आई, पत्नीसह तो मोटारसायकलीने तळोद्याला येत होता. तर मदन नाईक हे देखील आपल्या बारा वर्षाच्या पुत्र व गावकरीसोबत येत होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.