
शहादा | ता. प्र. - SHAHADA
अवैधरित्या विनापरवाना विदेशीदारूची तस्करी करणारे वाहन शहादा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास पकडले. यात 19 लाख 80 हजार रुपयाची विदेशी दारू व 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा सुमारे 24 लाख 80 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व त्याचा एक सहकारी वाहन सोडून पसार झाले आहेत. ही घटना शहादा-म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार व पो.कॉ.अनमोल राठोड हे म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे गस्त घालत असताना त्यांना एक वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येताना दिसले. त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पोलीसांच्या वाहनाला एका बाजूला धडक देऊन म्हसावद रस्त्याकडे वेगाने पळाले. या घटनेची माहिती तात्काळ म्हसावद पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नाकाबंदी केली असता म्हसावद पोलिसांच्या वाहनालाही धडक देत संशयितांनी तोरणमाळ रस्त्याकडे पळ काढला. मात्र घाट रस्ता असल्याने चालकाने व त्याचा साथीदारासह वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी बोलेरो वाहन (क्रमांक एमएच - 08-एच- 8985) शहादा पोलीस ठाण्यात आणले. त्यात ब्लेंडर व्हिस्की (Blender whiskey) या विदेशी दारूने भरलेल्या 3 हजार बाटल्यांचे 250 खोके आढळून आले. या दारूची किंमत 19 लाख 80 हजार इतकी असून बोलेरो वाहनाचे 5 लाख असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पो.कॉ. अनमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीतांविरुद्ध विनापरवाना अवैधरीत्या दारूची वाहतूक व शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय वाहनास धडक देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन नेऊन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.