राज्याच्या इतिहासात प्रथमच विना खात्याचे मंत्री ध्वजवंदन करणार

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा टोला
राज्याच्या इतिहासात प्रथमच विना खात्याचे मंत्री ध्वजवंदन करणार

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्यभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे (Amrit Jubilee Year of Independence) ध्वजवंदन (Flag salute) विना खात्याचे मंत्री (Minister without portfolio) त्या त्या जिल्हयात करणार आहेत. राज्याच्या इतिहासात (history of the state) आतापर्यंत असे कधीच घडले नव्हते, असा टोला माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

आ.बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात चाळीस दिवस झाले मंत्रीमंडळाचा खेळखंडोबा सुरु आहे. आधी मंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु होता, आता खातेवाटपावरुन रस्सीखेच सुरु झाला आहे. यापुर्वी ज्या दिवशी मंत्र्यांचा शपथविधी होतो, त्याचदिवशी खाते वाटप होवून मंत्रीमंडळ कामाला लागत असते. मात्र, राज्याच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की, चाळीस दिवसापासून दोन मंत्र्यांचे सरकार होते. तीन दिवसांपुर्वी मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे.

परंतू अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी विना खात्याचे मंत्री त्या त्या जिल्हयात ध्वजवंदन करणार आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे ते म्हणाले.

आ.थोरात पुढे म्हणाले, दोन पक्षांनी मनापासून एकत्र आल्यास युती होत असते. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ दिसत नाही. आधी मंत्री पदावरुन, आता खातेवाटपावरुन ओढाताण सुरु आहे.

त्यामुळे राज्यात अनेक प्रश्‍न असतांना त्याकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के स्थान दिले जात असतांना राज्याच्या मंत्री मंडळात एकही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरुन सरकारचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे, याची जाणीव होते, असेही ते म्हणाले.

आ.थोरात म्हणाले, ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त असते तो विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा दावेदार असतो. शिवसेनेने मात्र, परस्पर ही निवड केली आहे. यासाठी त्यांनी चर्चा तरी करायला हवी होती. कारण चर्चेने प्रश्‍न सुटतात.

त्यामुळे शिवसेनेबद्दल नाराजी आहेच. परंतू भाजपाची कार्यपद्धती या देशाला मानवणारी नाही. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने आम्ही आज तरी महविकास आघाडीतच आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री ऍड.के.सी.पाडवी, आ.सुधीर तांबे, आ.शिरीषकुमार नाईक, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री पद्माकर वळवी, राजाराम पानगव्हाणे, प्रभारी दिलीप नाईक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com